स्पॉट फिक्सिंगमुळं क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात - सुप्रीम कोर्ट

क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असून तो खेळाडू वृत्तीनंच खेळला गेला पाहिजे, पण तुम्ही फिक्सिंगसारख्या प्रकारांना पाठिशी घालून क्रिकेटलाच संपवत आहात अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयची कानउघडणी केली आहे. 

Updated: Nov 24, 2014, 04:40 PM IST
स्पॉट फिक्सिंगमुळं क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात - सुप्रीम कोर्ट title=

नवी दिल्ली: क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असून तो खेळाडू वृत्तीनंच खेळला गेला पाहिजे, पण तुम्ही फिक्सिंगसारख्या प्रकारांना पाठिशी घालून क्रिकेटलाच संपवत आहात अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयची कानउघडणी केली आहे. 

बीसीसीआयचे प्रमुख आणि बेटिंग प्रकरणात अडकलेल्या आयपीएल संघाचे मालक या नात्यानं श्रीनिवासन यांनी उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर उत्तर द्यायलाच पाहिजे, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

मुद्गल समितीनं दिलेल्या रिपोर्टवर सुनावणी करत आज सुप्रीम कोर्टानं म्हटलं, अशा घटनामुळं क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात असून त्यावरचा विश्वास तुटतोय. आम्ही न्यायमूर्ती मुद्गल समितीच्या रिपोर्टमधील निष्कर्षांना बरोबर मानतोय. क्रिकेट खऱ्या भावनेनं खेळलं गेलं पाहिजे. मात्र फिक्सिंगमुळं खेळ संपतो.

सोमवारी आयपीएल फिक्सिंग प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुदगल समितीच्या अहवालाचा दाखला देत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला फटकारलं. मुदगल समितीच्या अहवालात श्रीनिवासन यांना क्लीन चीट मिळाल्यानं त्यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी भूमिका बीसीसीआयनं न्यायालयासमोर मांडली. यावर सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला धारेवरच धरत त्यांचं म्हणणं फेटाळून लावलं. 

भारतात क्रिकेट हा धर्म असून मॅचेस फिक्स असल्याचं जनतेच्या लक्षात आल्यास स्टेडियममध्ये लोकं येतील का? असा सवालही सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला विचारला.  मुदगल समितीच्या निष्कर्षांवर निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयतर्फे चौकशी समितीची स्थापना केली जाईल आणि त्यामध्ये श्रीनिवासन यांचा सहभाग नसेल असं आश्वासन बीसीसीआयनं कोर्टाला दिले. यासंदर्भातील पुढील सुनावणी उद्या दुपारी होणार आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.