नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून(बीसीसीआय) भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली यांची प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न तर अजिंक्य रहाणेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस कऱण्यात आलीये.
तब्बल चार वर्षानंतर बीसीसीआयने क्रिकेटपटूची या पुरस्कारासाठी शिफारस केलीये. २०१२ मध्ये बीसीसीआयने माजी कर्णधार राहुल द्रविडच्या नावाची खेलरत्नसाठी शिफारस केली होती. त्यानंतर आता विराटची शिफारस कऱण्यात आलीये.
आतापर्यंत दोन क्रिकेटपटूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आलेय. सचिन तेंडुलकरला १९९७-९८ला त्यानंतर महेंद्रसिंग धोनीला २००७ मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विराट कोहलीला २०१३ मध्ये अर्जुन पुरस्कार बहाल करण्यात आला.
बीसीसीआयकडून दोन क्रिकेटपटूंच्या नावांची शिफारस आमच्याकडे आलीये. ही नावे निवड समितीला पाठवली जातील असे क्रीडा मंत्रालयाने सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, खेलरत्न पुरस्कारांसाठी विराटसोबत शूटर जितू राय, एस गोल्फर अनिर्बन लाहिरी, स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल आणि धावपटू टिंटू लुका यांच्या नावांचाही समावेश आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील रहाणेची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता अर्जुन पुरस्कारासाठी त्याच्या नावाची शिफारस करण्यात आलीये. गेल्या वर्षी मुंबईकर क्रिकेटपटू रोहित शर्माला हा पुरस्कार देण्यात आला होता. अर्जुन पुरस्कारासाठी रहाणेसोबत ललिता बाबर, ओ पी जैशा, शूटर अपूर्वी चंडेला आणि पी.एन.प्रकाश स्पर्धेत आहेत.