कटक : मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरी अनिर्णित राहिली खरी. पण, शेवटी मुंबईनेच रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता मुंबईची लढत सौराष्ट्र संघाशी असेल.
मुंबईने पहिल्या डावात ३७१ धावा केल्या होत्या. मध्य प्रदेशला २२७ धावांत रोखून मुंबईने पहिल्या डावात १४४ धावांची आघाडी मिळवली. मुंबईने दुसऱ्या डावात ४२६ धावा केल्या आणि मध्य प्रदेशसमोर विजयासाठी ५७१ धावांचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवसअखेर मध्य प्रदेशने २ बाद ९९ धावा केल्या होत्या. पण, पहिल्या डावातील आघीडीमुळेच मुंबईने अंतिम सामन्यात प्रवेश केला.
यंदाच्या मोसमात नमन ओझाने या सामन्यात पहिलेच शतक ठोकले. पण, तरी ते व्यर्थ ठरले. मध्य प्रदेशच्या हरप्रीत सिंगने या मोसमात सर्वाधिक म्हणजे एकूण ७५० धावा केल्या.
विशेष म्हणजे २०१२-१३ च्या मोसमातही मुंबई आणि सौराष्ट्रांच्या संघांमध्येच अंतिम सामना झाला होता. हा सामना मुंबईने जिंकला होता. यंदाच्या फायनलचा हा सामना येत्या २४ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. तो पुण्यात खेळवला जाईल.