पर्थ: ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारतानं २०१ धावांचे ठेवलेले आव्हान इंग्लंड संघानं ७ गडयांच्या बदल्यात पूर्ण करीत फायनलमध्ये धडक मारली. १ फेब्रुवारी रोजी होणारा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंड यांच्यात पर्थ इथं होणार आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला केवळ २०० धावाच करता आल्या. भारतीय संघाला ५० षटकं पूर्ण खेळता आली नसून भारतीय संघ ४८.१ षटकांतच सर्वबाद झाला. भारताकडून अजिंक्य रहाणे यानं सर्वाधिक ७३ धावा केल्या. शिखर धवन ३८, विराट कोहली ०८, सुरेश रैना ०१, अंबाती रायडू १२, महेंद्र सिंग धोनी १७, स्टूअर्ट बिन्नी ०७, रवींद्र जाडेजा ०५, अक्षर पटेल ०१, मोहित शर्मा नाबाद ०७, मोहम्मद शामी २५ धावांच्या बळावर भारतानं सर्वबाद २०० धावा केल्या.
भारतानं ठेवलेलं आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात फारशी चमकदार झाली नाही. बेल १० धावांवर असताना इशांत शर्मानं त्याला पायचित ठरवलं. इंग्लंडकडून टेलरनं सर्वाधिक ८२ धावा केल्या. रुट ०३, मोर्गन ०२, बोपारा ०४ धावांवर बाद झाले. इंग्लंडचा डाव कोसळला असतानाच बटरनं उत्तम फलंदाजीचं दर्शन घडवलं. त्यानं ६७ धावा करीत संघाला विजयाजवळ आणून ठेवलं. अखेरीस इंग्लंडनं ७ गडी गमावित भारतावर विजय मिळविला. भारताकडून स्टूअर्ट बिन्नीनं ३, मोहित शर्मा २ तर सामी आणि अक्षर पटेलला प्रत्येकी एक-एक गडी बाद करण्यात यश मिळालं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.