तर पाकिस्तान 2019च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होणार नाही

2019च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय न होण्याची नामुष्की पाकिस्तानच्या टीमवर ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Updated: Jan 13, 2017, 06:04 PM IST
तर पाकिस्तान 2019च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होणार नाही  title=

मुंबई : 2019च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय न होण्याची नामुष्की पाकिस्तानच्या टीमवर ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयसीसीच्या वनडे टीमच्या क्रमवारीत पाकिस्तान सध्या 89 पॉईंट्ससह आठव्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीमध्ये 91 पॉईंट्ससह बांग्लादेश सातव्या तर 87 पॉईंट्ससह वेस्ट इंडिज नवव्या क्रमांकावर आहे.

2019साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कपमध्ये 30 सप्टेंबर 2017ची क्रमवारी ग्राह्य धरण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर 2017ला टॉप सात टीम आणि यजमान टीम म्हणजेच इंग्लंड या आठ टीम थेट क्वालिफाय होणार आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाबरोबर सुरु असलेल्या पाच वनडे मॅचच्या सीरिजमध्ये पाकिस्तानला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आठव्या क्रमांकावर कायम राहण्यासाठी पाकिस्तानला कांगारूंविरोधात किमान एक मॅच जिंकावीच लागणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान थेट क्वालिफाय झाली नाही तर त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे. आयसीसी वनडे क्रमवारीतल्या तळाच्या चार टीम आणि आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीगमधल्या सहा टीम अशा एकूण दहा टीमचा 2018मध्ये क्वालिफायर राऊंड खेळला जाणार आहे. या क्वालिफायर राऊंडमधल्या टॉपच्या दोन टीम 2019च्या वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय होतील.