सिडनी : सिडनीच्या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि टीम इंडियाने एकच जल्लोष केला. यावेळी ट्रॉफी घेण्यासाठी टीम इंडियासोबत सपोर्टिंग स्टाफही होता. साधारणपणे जिंकल्यानंतर ट्रॉफीसह क्रिकेटर फोटो काढतात. मात्र अचानक फोटोसेशनदरम्यान भारताने जिंकलेली ट्रॉफी एका सडपातळ दिसणाऱ्या युवकाच्या हातात देण्यात आली.
या व्यक्तीबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती असेल. या व्यक्तीचा टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान राहिलेय. राघवेंद्र असं या व्यक्तीचे नाव आहे. रघु या नावाने त्याला ओळखले जाते.
रघु सराव सत्रादरम्यान थ्रो-डाउनची जबाबदारी सांभाळतो. नेटवर कोणताही गोलंदाज असो वा नसो रघु सातत्याने बॉल फेकत असतो आणि भारतीय फलंदाजांना सरावात मदत करतो. रघुने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांसारख्या दिग्गजांसह सराव केलाय.
खरतंर रघुला क्रिकेटर बनायचे होते. यामुळेच तो मुंबईला आला होता. काही वर्षे अभ्यास केल्यानंतर तो हुबळीला गेला. तिथेही त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर तो बंगळुरूला आला. कर्नाटकातील एका क्रिकेट इन्स्टिट्यूटने रघुची जबाबदारी घेतली आणि पाहता पाहता तो रणजी टीमचा थ्रो-डाउन असिस्टंट झाला.
२००८ मध्ये अखेर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमी(एनसीए) मध्ये नोकरी मिळाली आणि काही दिवसांतच तो टीम इंडियाशी जोडला गेला. भारतीय टीममधील प्रत्येक क्रिकेटर रघुला भाऊ मानतो. सराव सत्रादरम्यान रघु कोणतीही कसर सोडत नाही.