रवि शास्त्रीमध्ये कोणतंही टॅलेंट नव्हतं - कपिल देव

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ऑलराऊंडर कपिल देव यांनी आपला सहखेळाडू रवि शास्त्रीबद्दल मोठा खुलासा केलाय. 

Updated: May 24, 2017, 10:27 AM IST
रवि शास्त्रीमध्ये कोणतंही टॅलेंट नव्हतं - कपिल देव title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ऑलराऊंडर कपिल देव यांनी आपला सहखेळाडू रवि शास्त्रीबद्दल मोठा खुलासा केलाय. 

आकाश चोपडानं क्रिकेटवर 'नंबर्स डू लाय' नावाचं एक पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाच्या प्रकाशन करताना एक प्रेस कॉन्फरन्स बोलावण्यात आली होती. यावेळी कपिल देव बोलत होते.

'रवि शास्त्रीसारखा खेळाडू ज्यामध्ये कोणतंही टॅलेंट नाही आणि तो एवढ्या प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळू शकतो... मी समजतो की ही त्याची सफलता आहे'

रवि शास्त्रीमध्ये क्रिकेटची कोणतीही प्रतिभा नव्हती... परंतु, जिंकण्याच्या तीव्र इच्छेखातर तो दीर्घकाळ भारतीय टीममध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला, असं कपिल देव यांनी म्हटलंय. 'रवि शास्त्रीची इच्छाशक्ती कमालीची होती... टीममध्ये आम्ही या गोष्टीचं कौतुक करतो... आम्ही म्हणायचो, रवि ३० ओव्हरपर्यंत खेळ, भले १० रन्स का बनवेना... तुझं ३० ओव्हर खेळणं चांगलं ठरेल कारण त्यानंतर बॉलिंग थोडी थंड पडते... मग आम्ही बॉलर्सला ठोकून काढू शकतो...' अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितलीय. 

उल्लेखनीय म्हणजे, १९८३ मध्ये ज्या भारतीय टीमनं पहिला-वहिला क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता त्या टीमचा कॅप्टन कपिल देव होता... आणि रवि शास्त्री या टीमच्या खेळाडूंपैंकी एक... 

कपिलच्या म्हणण्याप्रमाणं, 'क्रिकेटर दोन तऱ्हेचे असतात... एक ज्यांच्यात क्षमता असते, परंतु ते कमी काळ टिकून राहतात, दुसरे ते ज्यांच्यात योग्यता नसते आणि ते दीर्घकाळ खेळत राहतात.'  

अनिल कुंबळेबद्दल बोलताना, तोही अॅथलिटसारखा बिलकूल नव्हता, परंतु, प्रदर्शनाबद्दल म्हणाल तर त्याच्यासारखं कुणीही नव्हतं... असं  म्हणतानाच सौरभ गांगुलीचंही नाव कपिलनं याच यादित जोडलं.