मुंबई : भारतीय क्रिकेट टीमच्या कोचपदी निवड न झाल्यामुळे रवी शास्त्री भलताच नाराज झालेला आहे. रवी शास्त्रीनं आता आयसीसीच्या क्रिकेट समितीमधूनही राजीनामा दिला आहे. रवी शास्त्री हा आयसीसीच्या मिडीया रिप्रेझेंटेटिव्ह या पदावर होता.
आयसीसीच्या या समितीचा अध्यक्ष अनिल कुंबळे आहे, यामुळे रवी शास्त्रीनं दिलेल्या या राजीनाम्याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मी सहा वर्षांपासून या पदावर आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी राजीनामा दिला असल्याचं शास्त्रीनं पीटीआयला सांगितलं आहे.
शास्त्रीऐवजी अनिल कुंबळेची भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून वर्णी लागली. कुंबळेच्या नियुक्तीवरून शास्त्रीनं उघड शब्दांमध्ये टीका केली. कुंबळेच्या नियुक्तीवरून शास्त्रीनं सौरव गांगुलीविषयीही प्रश्न उपस्थित केले होते. यावरुन गांगुली आणि शास्त्रीमध्ये कलगीतुरा रंगला होता.