मुंबई : 14 नोव्हेंबर 2013 हा दिवस कोणताही सच्चा क्रिकेटप्रेमी विसरणार नाही. याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटला अलविदा केला. त्यावेळी क्रिकेटच्या या देवाला पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियम खच्चाखच भरलं होतं. तिथं केवळ एक व्यक्ती दिसत नव्हती ती म्हणजे बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील.
संदीप पाटील यांच्या गैरहजेरीची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान संदीप पाटील यांच्यामुळेच सचिनवर निवृत्तीसाठी दबाव वाढला होता आणि संदीप पाटील यांनी सचिनला एक मेसेज पाठवून निवृत्ती घेण्यासाठी भाग पाडलं अशी चर्चा त्यावेळी चांगलीच रंगली होती. मात्र त्यावेळी संदीप पाटील यांनी असं काहीही न घडल्याचं सांगून या चर्चेला पूर्मविराम दिला होता.
मात्र आता निवड समितीचे अध्यक्ष म्हणून आपल्या अखेरच्या पत्रकार परिषदेत त्यांना हा प्रश्न पुन्हा विचारण्यात आला. यावेळी मात्र संदीप पाटील यांनी काही बाबी हा खाजगी असतात त्या कधीही उघड करायच्या नसतात सांगून सेफ गेम खेळला.
एवढचं नव्हे तर वन-डे सीरिजमध्ये तुझा टीममध्ये समावेश होईलच याची काही खात्री नाही असंही त्यांनी यापूर्वी सचिनला कळवल्यानं सचिनननं 18 मार्च 2012मध्ये वन-डेमधून अचानकपणे निवृत्ती जाहीर केली होती.
संदीप पाटील यांनी आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळामध्ये अनेक दिग्गज क्रिकेटर्सना वगळण्याची हिम्मत दाखवली. सेहवाग, गंभीर, युवराज, हरभजन आणि झहीर यांच्या कामगिरीत घसरण झाल्यानं संदीप पाटील यांनी या दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला. निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक धाडसी निर्णय घेतल्यानं आपण काही मित्र गमावल्याची खंत त्यांनी जाता जाता व्यक्त केली.