ऑकलंड : पाकिस्तानच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या जेवणाचं बिल एका चाहत्याला भरावं लागलं. शाहिद आफ्रिदी न्यूझीलंड दौऱ्यावर असताना त्याला या नामुष्कीला सामोरे जावे लागले. एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर स्थानिक चलन नसल्याने त्याचे जेवणाचे बिल एका चाहत्याला भरावं लागलं.
आफ्रिदी अमेरिकन डॉलर घेऊन रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेला होता. पण, बिल देताना त्याला स्थानिक चलन मागण्यात आले. अखेर त्याच्या मदतीला वकास नावेद हा चाहता धावून आला आणि त्याने आफ्रिदीच्या जेवणाचे बिल दिले.
यावर स्पष्टीकरण देताना आफ्रिदी म्हणाला, की मी आणि अहमद शेहजाद स्थानिक चलन घेऊन जाणे विसरलो होतो. माध्यमांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेस 20 जानेवारीपासून सुरवात होत आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात वास्तव्यास आहे.