मुंबई: ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर शॉन टॅट आयपीएलमध्ये कमबॅक करत आहे. दोन वेळा आयपीएल जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सनं टॅट ला आपल्या टीममध्ये घेतलं आहे. कोलकात्याच्या टीममध्ये असलेला बॉलर जॉन हेस्टिंग्स जखमी झाल्यामुळे त्याच्याबदली टॅटला घेण्यात आलं आहे.
33 वर्षांच्या टॅटला फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावामध्ये कोणीच विकत घेतलं नाही. पण आता टॅट कोलकत्याकडून खेळेल. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता सध्या 12 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कोलकत्याच्या टीममध्ये टॅट दाखल झाला आहे, आणि त्यानं टीमबरोबर ट्रेनिंगही केलं. कोलकत्याची मॅच आता शनिवारी पुण्याविरोधात होणार आहे. टॅटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2011 साली निवृत्ती घेतली होती. टॅट याआधी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. तर ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्यानं 35 वनडेमध्ये 62 विकेट आणि 21 टी 20 मध्ये 28 विकेट घेतल्या होत्या.