मुंबई : रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यावर भारतीय क्रिकेट संघाचा कोच कोण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, राहुल द्रविडने ही जबाबदारी पेलण्यास नकार दिल्याची बातमी पुढे येत आहे.
वसीम अक्रम, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांनी ही जबाबदारी राहुल द्रविडला दिली जावी अशी मागणी बीसीसीआयकडे केली होती. सध्या द्रविड भारताच्या अंडर-१९ संघाचा कोच आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्स या आयपीएलच्या संघाचाही तो कोच राहिला आहे. म्हणूनच या जबाबदारीसाठी तो योग्य असल्याचा विश्वास अनेकांना होता. मात्र, द्रविडने ही मागणी फेटाळून लावली आहे.
'कोचिंगसाठी तयार होण्याचा प्रश्न नाही. मला कोचिंग द्यायला खूप आवडतं. पण, अशा मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारायला आपल्याकडे वेळ हवा. माझ्याकडे सध्यातरी तो नाही,' असे द्रविडने म्हटले आहे. यापूर्वीही त्याने ही जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. कोच होणं म्हणजे संघासोबत ९-१० महिने एकत्र रहावं लागतं. आता या क्षणी त्याला शक्य नसल्याचं त्याचं म्हणणं आहे.