मुंबई : शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताला विजय मिळवून देणाऱ्या विराट कोहलीचं चहूबाजूंनी कौतुक होतंय. सहारणपूर या त्याच्या मूळ गावीही लोकांनी हा आनंद साजरा केला. याच ठिकाणी विराट पहिल्यांदा क्रिकेट खेळायला शिकला.
वयाच्या नवव्या वर्षी विराटने बॅट हातात घेतली ती त्याचे मार्गदर्शक असणाऱ्या राजकुमार शर्मा यांच्या प्रशिक्षणाखाली. विराटलाही त्याच्या शर्मा सरांविषयी प्रचंड आदर आहे.
मूळचे पटेलनगरेचे स्थायिक असणाऱ्या राजकुमार शर्मा यांनी त्यांच्या कारकीर्दीतील मोठा काळ कानपूरच्या ग्रीन पार्क क्रिकेट मैदानात घालवलाय. त्यानंतर ते १९८० साली दिल्लीला गेले. चार वर्ष रणजीमध्ये दिल्ली संघाकडून खेळल्यानंतर १९८७ साली त्यांची आंतरराष्ट्रीय संघात निवड झाली. त्यांनी आंतरराष्ट्रीय संघात केवळ पाकिस्तानविरुद्धचा एक सामना खेळला.
त्यानंतर त्यांनी निवृत्ती घेऊन स्वतःची क्रिकेट अकादमी सुरू केली. या ठिकाणी विराट आणि त्यांची भेट झाली. तिथेच विराटने क्रिकेटचे धडे गिरवले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार शर्मा म्हणतात 'आधीप्रमाणेच आजही विराट मी दिलेल्या सूचनांचा विचार करतो.' देशाबाहेर खेळायला जाण्याआधी विराट नेहमी त्यांना फोन करुन त्यांचा सल्ला घेतो. सामना कितीही लहान अथवा मोठा असो, विराट नेहमीच त्याच्या गुरुंशी त्याविषयी चर्चा करतोच.