युवराजनं उगवला सूड; ‘दादा’ रडकुंडीला...

क्रिकेट खेळाडू मैदानापेक्षा सर्वात जास्त वेळ कुठं व्यतीत करत असतील तर तो म्हणजे ड्रेसिंग रुममध्ये... इथं घडणारे अनेक किस्से ऐकण्यासारखे आणि मजेशीर असतात... असाच एक किस्सा नुकताच उघड झालाय... 

Updated: Aug 14, 2014, 08:50 AM IST
युवराजनं उगवला सूड; ‘दादा’ रडकुंडीला...  title=
फाईल फोटो

मुंबई : क्रिकेट खेळाडू मैदानापेक्षा सर्वात जास्त वेळ कुठं व्यतीत करत असतील तर तो म्हणजे ड्रेसिंग रुममध्ये... इथं घडणारे अनेक किस्से ऐकण्यासारखे आणि मजेशीर असतात... असाच एक किस्सा नुकताच उघड झालाय... 

मैदानात असतात आणि दिसतात त्यापेक्षा वेगळंच रुप या खेळाडूंचं ड्रेसिंग रुममध्ये दिसतं... याच ड्रेसिंग रुममधले काही किस्से स्पोर्टस वेब साईट ‘स्पोर्टस क्रीडा’नं समोर आणलाय. हेच किस्सा वाचल्यावर तुम्हालाही तुमचं हसू रोखणं कदाचित कठिण जाईल.

युवीला खावी लागली झोपेची गोळी... 
हा किस्सा आहे वन डे क्रिकेटमध्ये एन्ट्री करणाऱ्या युवराज सिंहचा आणि त्यावेळचा कॅप्टन सौरव गांगुलीचा... त्यावेळ युवराज वन डे टीममध्ये पदार्पण करत होता. युवी आपल्या पहिल्या मॅचमुळे अगोदरच टेन्शनमध्ये होता... आपल्या पहिल्या मॅचची तयारी तो करत होता त्याचवेळेस टीमचा कॅप्टन सौरव गांगुली त्याच्याकडे आला आणि म्हणाला ‘ओपन करणार ना?’... 

कॅप्टनचे हे शब्द ऐकून युवराजचं टेन्शन आणखीनच वाढलं... युवराजनं त्यला होकार तर दिला पण त्याचं टेन्शन इतकं वाढलं की त्यामुळे झोपेची गोळी घेऊन त्याला झोपावं लागलं... दुसऱ्या दिवशी मात्र गांगुलीनं आपण गंमत करत होतो... असं युवीला सांगितलं. 


 

'दादा' आला रडकुंडिला... 
‘दादा’साठी ही गोष्ट इथंच संपली मात्र युवीसाठी ही गोष्ट संपली नव्हती... याचा बदला घेण्यासाठी तो आतूर झाला होता... ही संधी त्याला पाच वर्षांनंतर मिळाली...

त्यावेळी युवी टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू बनला होता. टीममध्ये त्याची एक खास पोझिशन होती... मॅच होती पाकिस्तान विरुद्ध... टीमचा कॅप्टन सौरव गांगुली टीम मिटिंगसाठी ड्रेसिंग रुममध्ये पोहचला होता. पण, समोरचा दृश्यं पाहून तो जागीच खिळला... 

सगळे खेळाडू शांत होते आणि सगळ्यांच्या हातात एक न्यूजपेपरचा तुकडा होता. गांगुली काही बोलणार त्याआधीच सगळ्यांनी हा पेपर दादासमोर धरला... पेपरवरची बातमी पाहून गांगुलीच्या पायाखालची जमिनच सरकली.

या पेपरमध्ये सौरव गांगुलीची एक मुलाखत छापली होती आणि त्यात त्यानं इतर खेळाडूंवर जोरदार टीका केली होती... मग, काय गांगुली कधी युवराजकडे पाहत होता, कधी सेहवागकडे तर कधी भज्जीकडे... पण, ते मात्र ढिम्म शांत झाले होते...

ही शांतता सहन न झाल्यानं गांगुली प्रत्येक खेळाडूकडे जाऊन त्यांना जीव तोडून समजावण्याचा प्रयत्न करत होता की, आपण अशी मुलाखत दिलेलीच नाही... पण, कुणीच ऐकायला तयार नव्हतं... त्यामुळे, रडकुंडिला आलेल्या दादानं अखेर कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली. पण,...

‘द वॉल’ राहुल द्रविडला रडकुंडिला आलेल्या दादाची ही अवस्था सहन झाली नाही... आणि त्यानं यामागची खरी कहानी सगळ्यांसमोर ठेवली... ही सगळी करनी होती युवीची... त्यानं अगोदरच काही पेपर प्रिंट केले होते... ज्यात, या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या होत्या... त्यानंतर मात्र सगळ्यांची हसता हसता पूरेवाट झाली. कुणाचंही हसू थांबण्याचं नाव घेत नव्हतं... त्यानंतर मात्र ‘दादा’नं युवीला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावायला सुरुवात केली... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.