www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ब्लॅकबेरीनं आपल्या बीबीएम सेवेचं अँड्रॉईडवरील लाँचिंग पुढं ढकलंलय. कारण, बीबीएमचं अधिकृत अँड्रॉईड अॅप कंपनीकडून लाँच होण्याआधीच त्याचं व्हर्जन लिक झालं आणि अवघ्या आठ तासांत १० लाख युझर्सनी ते इन्स्टॉलही केलं. ही बाब निदर्शनास येताच, कंपनीनं बीबीएमच्या अँड्रॉईड अॅपचं लाँचिंग पुढं ढकललंय.
त्यामुळं बीबीएमची सेवा अँड्रॉईड आणि आयफोनवरही देण्याची जोरदार तयारी करणाऱ्या ब्लॅकबेरीची चांगलीच गोची झालीय. भारतातल्या मोबाइल बाजारपेठतील अँड्रॉईडची लाट पाहून, ब्लॅकबेरी मेसेंजर सेवा लवकरच अँड्रॉईड आणि आयफोनवरही उपलब्ध करून देण्याचा निर्णय ब्लॅकबेरी कंपनीनं अलीकडंच जाहीर केला होता.
२१ तारखेपासून अँड्रॉईड मोबाइल युझर्सना गुगल प्लेवरून बीबीएम डाउनलोड करता येणार होतं. परंतु, कंपनीनं अधिकृतपणे हे अॅप लाँच करण्याआधीच, त्याचं अनरिलिझ्ड व्हर्जन ऑनलाईनवर लिक झालं. `व्हॉट्स अॅप`वरून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ८ तासांत १० लाख युझर्सनी हे अॅप इन्स्टॉल केलं. त्यावरून ब्लॅकबेरीत एकच खळबळ उडाली.
बीबीएमचं सेवा अँड्रॉईड आणि आयफोनवर उपलब्ध करून देण्यासाठी आमची टीम अवितरतपणे काम करतेय. पण जोपर्यंत ते पूर्णपणे तयार होत नाही, तोवर ते आम्ही लाँच करणार नाही, असं ब्लॅकबेरीनं स्पष्ट केलंय.
मात्र ज्यांनी आता आपल्या अँड्रॉईड आणि आयफोनवर ज्यांनी लिक झालेलं व्हर्जन इन्स्टॉल केलंय, त्यांना ते वापरता येणार आहे. पण त्यात अनेक त्रुटी असतील. आता या सगळ्या त्रुटी दूर झाल्याशिवाय बीबीएमचं अधिकृत अँड्रॉईड अॅप गूगल प्लेवर येणार नसल्याचं ब्लॅकबेरीनं जाहीर केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.