www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वेळी-अवेळी विमान पकडायला जायचंय किंवा असंच कुठेतरी... आयत्या वेळी टॅक्सी कुठून मिळणार? हा प्रश्न सतावत असेल तर डोन्ट वरी... फक्त आपला मोबाईल उचला आणि ‘बुक माय कॅब’च्या मोबाईलवर अॅप्लिकेशनवर जा... या अॅपच्या वापरासाठी तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट असेल तर चांगलंच आहे पण, नसेल तरी काही हरकत नाही.
‘बुक माय कॅब डॉट कॉम’च्या माध्यमातून मुंबईत टॅक्सीचं बुकींग करता येतं. आता याच साईटने एक अँड्रॉईड फोन्ससाठी एक अॅप्लिकेशन तयार केलंय. विशेष म्हणजे, या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून काळी पिवळी टॅक्सीही बुक करता येणार आहे. या अॅप्लिकेशनचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, टॅक्सी बुक करताना तुमचा फोन इंटरनेटशी जोडलेला नसेल तर ‘सेन्ड’ बटन क्लिक केल्यावर तुम्हाला एसएमएस पाठवण्याचा पर्याय दिला जाईल. त्याला ओके केल्यावर टॅक्सी बुक होईल. बुकींग केल्यावर पंधरा ते वीस मिनिटात टॅक्सी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. जीपीएस आणि जीपीआरएस यंत्रणा असलेल्या टॅक्सी तुमच्या सेवेत हजर होतील जेणेकरून त्याचं ‘रिअल टाईम ट्रॅकींग’ शक्य आहे.
आयत्या वेळी `फ्लिट टॅक्सी` न आल्यामुळे अविनाश गुप्ता या `आयआयटीयन`चं विमान चुकलं होतं. या घटनेनंतर गुप्ता यांना दूरध्वनीवरून साधी टॅक्सी मागविण्याची सेवा पुरविण्याची कल्पना सुचली. त्यातूनच त्यांनी `बुक माय कॅब` ही सेवा सुरू केली. ६१२३४५६७ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा संकेतस्थळावरून आरक्षण करून ही टॅक्सी बोलावता येते. `बुक माय कॅब` या संस्थेने टॅक्सी विकत घेतल्या नसल्याने टॅक्सी चालकांना होणाऱ्या फायद्यातील काही टक्के वाटा फक्त संस्थेला जातो, तरीही या सेवेसाठी प्रवाशांवर कसलाही वाढीव भार पडत नाही. काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे नेहमीचे दरच या सेवेसाठी आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.