www.224taas.com, झी मीडिया, मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीज पुढील तीन वर्षांत 1.8 लाख कोटींची बाजारात गुंतवणूक करणार आहे. तसेच आपली बहुप्रतीक्षित 4जी ब्रॉडबॅंड सेवा 2015पर्यंत सुरु करणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योग समूहातील रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड ही उपकंपनी पुढील वर्षात `4जी ` सेवा विकण्यास प्रारंभ करणार आहे. त्यासाठी ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी बुधवारी भागधारकांच्या सभेत ही घोषणा केली. यावेळी नीता अंबानी या कंपनीच्या व्यवस्थापक मंडळात सहभागी झाल्या. त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
`रिलायन्स जिओ`ची ही सेवा देशातील सर्व राज्यांमधील सुमारे पाच हजार मोठ्या आणि छोट्या शहरांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे, तसे रिलायन्सने स्पष्ट केले आहे.
देशात ९० टक्क्यांहून अधिक शहरी भाग आणि दोन लाख १५ हजारांहून अधिक खेडी इतकी तिची व्याप्ती असेल. यातून देशातील एकूण सहा लाखांहून अधिक शहरांमध्ये या सेवेचे जाळे विस्तारले जाईल.
`4जी नेटवर्क`द्वारे टेलिव्हिजन सेवा विकण्याचीही `आरजिओ`ची योजना असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. गेल्या जानेवारी महिन्यापर्यंत कंपनीने 150 दूरचित्रवाहिन्या लोड केल्या असून, मोबाइल फोनपासून ते टेलिव्हिजन सेट्सपर्यंतच्या सर्व उपकरणांवर `हायस्पीड फोर जी नेटवर्क`द्वारे ही सेवा पुरविली जाईल, असे सांगण्यात आले.
रिलायन्स इंडस्ट्रीजने अलिकडेच `नेटवर्क एटीन मिडिया अॅण्ड इन्व्हेस्टमेन्ट्स लिमिटेड` ही कंपनी तिच्या `टीव्ही एटीन ब्रॉडकास्ट लिमिटेड` या उपकंपनीसह चार हजार कोटी रुपयांना खरेदी केली आहे. या माध्यमसमूहामार्फत काही वृत्तवाहिन्या आणि मनोरंजन वाहिन्या चालविल्या जातात. यातून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेलिकॉम सेवेच्या विस्ताराला चालना मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.