www.24taas.com, लंडन
व्याकरणात तुम्ही थोडे अडखळता... पण, चूक नेमकी काय झालीय ते लक्षात येत नाही. अशावेळेस कुणाची तरी मदत घ्यावी लागते. होय ना! पण, आता तुम्ही स्वत: ही चूक दुरुस्त करू शकता आणि अशी चूक तुमच्या लक्षात आणून देणार आहे एक ‘पेन’...
जर्मनीच्या एका कंपनीनं असा एक हाय-टेक पेन बनवलाय जो तुमची व्याकरणातली हरएक चूक तुमच्या लक्षात आणून देईल. आता चूक झाली हे कसं ओळखायचं… तर, जेव्हा तुम्ही चूक कराल तेव्हा हा पेन थरथरायला लागेल.
लिखाणात मदत होण्याच्या उद्देशानं जर्मनीच्या ‘लर्नस्ट्रिफ्ट’ या कंपनीनं युवकांसाठी हा पेन तयार केलाय. पण, वेगवेगळ्या वयांतील लोकही या पेनचा वापर करू शकतात.
‘डेली मेल’नं दिलेल्या बातमीनुसार, हा पेन त्वरीतरित्या व्याकरणातल्या आणि लिखाणातल्या चुका पकडण्यासाठी सक्षम आहे. चूक झाल्यास तो लगेचच थरथरायला लागल्यामुळे आपण लेखक ती चूक लगेचच सुधारू शकतो.
‘लर्नस्ट्रिफ्ट’नं दिलेल्या माहितीनुसार, फॉल्क आणि मॅन्डी वोल्स्की यांनी हा पेन निर्माण केलाय. आपल्या मुलाच्या लेखनाच्या प्रयत्नाला पाहून त्यांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली.