आसाराम बापूंच्या भक्तांचा मीडियावर हल्ला

नागपूरमध्ये आसाराम बापूंनी लाखो लिटर पाणी वाया घालवत धुळवड साजरी केली होती. या गोष्टीला झी २४ तास ने वाचा फोडल्यावर आसाराम बापूंच्या भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 18, 2013, 06:41 PM IST

www.24taas.com, नवी मुंबई
नवी मुंबईत पाण्याची नासाडी करणा-या आसाराम बापूंच्या भक्तांनी आमखी एक कमाल केलीय. पाण्याच्या नासाडीविरोधात आवाज उठवणा-या मीडियावरच बापूंच्या भक्तांनी दगडफेक केली. यातील तीन अनुयायांना पोलिसांनी अटक केली आहे. मीडियावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिले आहेत.
ऐन दुष्काळात धुळवड साजरी करण्यावरुन अडचणीत आलेले असतानाही, संत म्हणवून घेणारे आसाराम बापू आडमुठ्या भूमिकेवर कायम राहिलेत. नवी मुंबईत साज-या होणा-या धुळवडीच्या कार्यक्रमाला झालेल्या विरोधानंतरही बापूंची धुळवड साजरी झालीच. त्याचबरोबर सरकारच्या आदेशानंतर नवी मुंबई मनपानं टँकरची परवानगी नाकारल्यानंतर, ठाण्यातून या धुळवडीसाठी पाणी आणण्यात आलं आणि बापूंची धुळवड साजरी झालीच. आपण कुणालाच कसे जुमानत नाही, हेच आसाराम बापूंनी यातून दाखवून दिलंय.

या पाण्याच्या नासाडीला विरोध करण्यासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईतल्या पटनी मैदानावर आंदोलन केलं. यावेळी आरपीआय कार्यकर्ते आणि बापू भक्तांमध्ये बाचाबाचीही झाली. त्यानंतर या मुजोर बापू भक्तांनी मीडियावरही हल्ला केला.