आंगणेवाडीची यात्रा, विशेष कोकण रेल्वेच्या गाड्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या यात्रोत्सव अवघ्या काही तासांवर आला आहे. दरम्यान, कोकणातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेसाठी, कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 12, 2013, 05:41 PM IST

www.24taas.com,सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या यात्रोत्सव अवघ्या काही तासांवर आला आहे. दरम्यान, कोकणातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेसाठी, कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडणार आहे.
दक्षिण कोकणची काशी असलेल्या आंगणेवाडी मंदिरात विद्युत रोषणाईची कामे जोमाने सुरू झाले आहे. दोन दिवस आधीच मुंबईतील चाकरमानी या देवीच्या दर्शनासाठी मसुरे आंगणेवाडीत दाखल होत आहे. नवसाला पावणारी देवी अशी या भराडी मातेची ख्याती आहे. यावर्षी सुमारे १५ लाखांपेक्षा अधिक भाविक येणार असा अंदाज व्यक्त होत आहे.
आंगणेवाडीची १४ फेब्रुवारीला यात्रा आहे. त्यासाठी मुंबईतून रेल्वेच्या गाड्या सोडण्यात आल्या आहेत. १२ फेबुवारी रोजी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी सीएसटीवरून मंगळवारी १२ फेब्रुवारीला मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी २.२५ वाजता ती मडगावला पोहोचेल. त्यानंतर बुधवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता ही गाडी मडगावहून सुटणार असून ती गुरुवारी पहाटे ४.०५ वाजता सीएसटीला पोहोचेल.
२२ डब्ब्यांची ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी आदी स्टेशनांवर थांबेल.