www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी शिवसेना नगसेवकांमध्ये फ्रिस्टाईल झाली. महासभेच्या सभागृहातच हाणामारी झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या हाणामारीच्यावेळी सभागृहात तणाव पाहायला मिळाला. दरम्यान, सभागृहात नगरसेवकांमध्ये हाणामारीचा प्रकार समजताच पालिकेबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कल्याण पूर्वेतील पाणीटंचाईवर चर्चा सुरू असतानाच महासभेच्या सभागृहातच सत्ताधारी नगरसेवकांनी लाखोली वाहण्यास सुरूवात केली. त्यानंतर बाचाबाची होवून हाणामारी करीत राडा झाला. सभागृहात हा प्रकार झाल्याने महासभेत तणाव निर्माण झाला होता.
पाणीटंचाईच्या निषेधार्थ नगरसेवक अनंता गायकवाड आणि शरद पावशे यांनी सभा तहकूबीचा प्रस्ताव मांडला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण पूर्वेतील नागरिकांना पाणीटंचाई सहन करावी लागत असल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीसमस्येविरोधात प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
मनसेच्या नगरसेविका सुनीता घरत या पाणीप्रश्नाविषयी सभागृहात बोलत असतानाच शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मल्लेश शेट्टी हे त्यांच्या जागेवरून उठले. या ठिकाणी पाण्याची समस्या ही नगरसेविका पोटतिडकीने मांडत असताना सभागृह नेते रवींद्र पाटील हे टिंगलटवाळी, मस्करी करीत असल्याचा थेट आरोप त्यांनी त्यांच्याकडे बोट दाखवत केला. त्यांच्या आरोपामुळे सभागृह नेते पाटील हे सुद्धा संतप्त झाले. मी टिंगलटवाळी व मस्करी करीत नसून शेट्टी यांनी योग्य भाषा वापरावी, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. शेट्टी व पाटील यांच्यातील बाचाबाचीचे रूपांतर शिवीगाळीत झाले. त्यानंतर शेट्टी यांनी सभागृह नेत्यांकडे धाव घेतली.
दोघेही आमने-सामने भिडल्याने काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे, दीपेश म्हात्रे, प्रकाश पेणकर आदी नगरसेवक मंडळी दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न करीत होती. त्याच वेळी शेट्टी यांनी पाटील यांच्या दंडावर जोराचा फटका मारला, पाटीलही त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर राडा झाला. सभागृहातील वातावरण गंभीर बनल्याने महापौरांनी सभा तहकूब केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ