बदलापुरात ७० वर्षांचे आजोबा, ६० वर्षांची आजी लग्नाच्या बेडीत

मुंबई उपनगरातील बदलापूर शहरात एक अनोखा विवाह सोहळा पाहायला मिळाला. ७० वर्षांचे आजोबा आणि ६० वर्षांची आजी. चक्क आज लग्नाच्या बेडीत अडकलेत. या आजी-आजोबांच्या लग्नात वऱ्हाडीमंडळी होती ती त्यांची नातवंडे आणि मुलं. त्यांनीच त्यांना शुभेच्छा दिल्यात, नांदा सौख्य भरे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 19, 2013, 07:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बदलापूर
मुंबई उपनगरातील बदलापूर शहरात एक अनोखा विवाह सोहळा पाहायला मिळाला. ७० वर्षांचे आजोबा आणि ६० वर्षांची आजी. चक्क आज लग्नाच्या बेडीत अडकलेत. या आजी-आजोबांच्या लग्नात वऱ्हाडीमंडळी होती ती त्यांची नातवंडे आणि मुलं. त्यांनीच त्यांना शुभेच्छा दिल्यात, नांदा सौख्य भरे.

बदलापुरात सगळी लगबग सुरू होती आजी-आजोबांच्या लग्नाची. ७२ वर्षांच्या मनोहर बागुलांचं ६० वर्षांच्या सुमन निर्भवणे यांच्याशी लग्न जमलं. गुरुवारी दुपारी दोनच्या मुहूर्तावर बदलापूरच्या म्हस्कर सभागृहात दोघांचंही शुभमंगल पार पडलं.
या लग्नातली नवरी सुमन निर्भवणे याही उतारवयात एक सोबत शोधत होत्या आणि मनोहर यांच्या रुपातून त्यांना जोडीदार मिळाला. बदलापुरात या दोघांचा विवाह सोहळा अत्यंत आनंदाच्या वातावरणात पार पडला. या विवाह सोहळ्याला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उतारवयात सगळेच आजी आजोबा हळवे झालेले असतात. मुलांना त्यांच्यासाठी हवा तितका वेळ नसतो. त्यातच जोडीदारानं एक्झिट घेतली की अख्खं आयुष्य आणि एकटेपण खायला उठतं. आणि त्याचवेळी जोडीदाराची खरी गरज असते. ही उणीव या आजी-आजोबानी लग्नाच्या माध्यमातून भरून काढली.
मनोहर बागुलांच्या तीनही मुलांचे शिक्षण झाले आहे. त्यांची लग्नही झालीत. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नीचं निधन झालं. निवृत्तीनंतरचे आयुष्य खायला उठलं आणि ते बदलापूरमधल्या सम्राट ज्येष्ठ नागरिक मंडळाचे दोन वर्षांपूर्वी सदस्य झाले. तिथेच त्यांची ओळख सुमन यांच्याशी झाली. आयुष्याच्या संध्याकाळी हात धरणारं कुणीतरी असावं, म्हणून त्यांनी सुमन यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मनातील भावनांना जात, धर्म आणि वयाचंही काही बंधन नसतं. बदलापुरातील दोन ज्येष्ठांनी त्याची प्रचिती दिली आहे. घर आहे. आयुष्यभराचं संचित असलेली पेन्शन आहे, तीन मुले आहेत. मात्र त्यांच्याजवळ वेळ नाही. आयुष्याच्या उत्तरायणात प्रेमाचे दोन शब्द बोलणारं, तब्येतीची काळजी घेणारं कोणीअसावं, या उदात्त हेतूने या
दोन्ही ज्येष्ठांनी आयुष्याची सेकंड इनिंग सुरू करण्याचे ठरविले आणि आज या दोघांचा लग्न सोहळा पार पडला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.