www. 24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
कोकणात पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या दोन दिवसामंपासुन असलेली पूरस्थिती आजही कायम, चिपळूण, खेड, माखजण या बाजारपेठा पाण्याखाली असून संगमेश्वरलाही पुराचा धोका निर्माण झालाय.
संगमेश्वर सोनगिरी परिसरात सुमारे 3 फुट पाणी आहे. हाय टाईडमुळे रत्नागिरीनजीकच्या मांडवी परिसरात मोठे नुकसान झाले असुन नारळाची झाडे उन्मळुन पडली आहे. लांटांचे पाणी घरांच्या अंगणापर्यंत – किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेचे आदेश.
सिंधुदुर्गात आजही पावसाचा जोर कायम आहे. अधून-मधून कोसळना-या मुसळधार सरींमुळे पूर स्थिती अजून कमी झालेली नाही. भात शेतीत पाणी असल्यामुळे शेती कुजून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
कोकणात ७ जूनला सुरु झालेला पाउस त्यानंतर म्हणावा तसा ओसरलेला नाही. त्यामुळे शेतीच्या कामांची लगबग लवकर संपली असली तरी आता पुराचे पाणी ८ दिवस शेतीत साचून राहिल्याने शेती कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान संपूर्ण कोकणाला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय आज दुपारच्या हायटाइडचा धोका मालवण तालुक्यातील देवबागला बसण्याची शक्यता आहे. तेथील ग्रामस्थाना स्थलांतराच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यातल्या सावित्री, गांधारी, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीये. महाड, नागोठणे आणि रोहा शहराला पुराचा धोका आहे. नागोठणे शहरातल्या एस.टी स्टॅण्ड, मच्छी मार्केट, रिक्षा स्टॅड या सखल भागात २ फुटापर्यंत पाणी शिरलंय. वाकण फाटा ते सुधागड पाली वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीये. पाली गावाचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाशी संपर्क तुटलाय.
ठाण्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्यात पावसाचा एक बळी गेलाय तर पुरामुळे २० ते २५ गावांचा संपर्क तुटलाय. ट्रॅफिक जाम ठाण्यात झालंय. मुंब्रा बायपास रस्ता खचलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालीय. ठाणे, कल्याण, डोंबिवलीत संततधार सुरु आहे.
पालघर डहाणू परीसरात रात्रीपासुन जोरदार पाउस सुरु असून सूर्या, वैतरणा, दहेर्जा नदिला पूर आलाय. डहाणूत सकाळी शेतावर जात असलेल्या दक्षा सुनील बोभादे (२६) या महिलेचा काठी नदित वाहुन मृत्यू झालाय.
सूर्यानदीवरील मासवण पुल पाण्याखाली गेल्यामुळं पालघर – मनोर मुख्य रस्त्यांची वाहतूक ठप्प झालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.