`माथेरानच्या राणी`च्या तब्येतीसाठी कर्मकांडाचं स्तोम!

अंधश्रद्धेचे भूत अजून जायचे नाव घेत नाही... माथेरानची टॉय ट्रेन सुरळीत चालावी यासाठी यंदा नेरळ येथील रेल्वेच्या लोकोशेड मध्ये चक्क होम हवनचे आयोजन करण्यात आले होते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 26, 2014, 09:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, माथेरान
अंधश्रद्धेचे भूत अजून जायचे नाव घेत नाही... माथेरानची टॉय ट्रेन सुरळीत चालावी यासाठी यंदा नेरळ येथील रेल्वेच्या लोकोशेड मध्ये चक्क होम हवनचे आयोजन करण्यात आले होते. वारंवार रेल्वेचे इंजिन फेल होत असल्याने त्याचा फटका पर्यटकांना बसत असल्याने माथेरानच्या राणीवर आलेले संकट दूर करण्यासाठी धार्मिक विधी पार पडलेत.
हिरव्यागार वनराईने नटलेल्या डोंगराला प्रदक्षिणा घालीत वर जाणारी माथेरानची राणी वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत सापडली आहे. पावसाळ्यात दरड तर उन्हाळ्यात वारंवार इंजिन बंद पडत असल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकाला ट्रेनच्या प्रवासाला मुकावे लागावे लागते तर अनेकदा इंजिन बंद पडल्याने पर्यटकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. शंभरी ओलांडणाऱ्या माथेरान रेल्वे ने खर तर कात टाकायला हवे असताना रेल्वे खात्याच्या दुर्लक्षामुळे माथेरानच्या राणीवर बंद पडल्याचे संकट कायम आहे.
माथेरानच्या राणीवर आलेले संकट दूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी यंदा प्रथमच बदलापूर इथून सहा पौराहित्य मागविले होते. नेरळ येथील `लोको शेड`मध्ये विधिवत पूजा, होम हवन झाले. दरवर्षी सत्यनारायणाची पूजा नियमित होत असताना यंदा मात्र खास धार्मिक विधी संपन्न झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
माथेरान ट्रेनसाठी एकूण सहा इंजिन उपलब्ध आहेत त्यातील चार कसेबसे सुरु आहेत उर्वरित लोको शेडमध्ये दुरुस्ठीसाठी दाखल आहेत. माथेरानच्या ट्रेनला हेरीटेजचा दर्जा आहे. माथेरानच्या राणीचा शतक सोहोळा संपन्न झाल्यानंतर तरी रेल्वेने जुने इंजिन बदलून नवीन इंजिन द्यायला हवे होते तर वारंवार इंजिन बंद पडत असल्याने त्याचा फटका पर्यटकांसह बाजारावर बसत आहे. यावर रेल्वेचे स्थानिक अधिकारी काहीच भाष्य करीत नाहीत . 
पुरोगामी राज्यातील अंधश्रद्धा कायमची मिटावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु असताना रेल्वेसारख्या विभागातही कर्मकांडाचं स्तोम माजवलं जातंय ही नक्कीच धक्कादायक बाब आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.