बंदबाबत चर्चा न करताच नाव छापलं - मनसे

ठाणे बंदच्या समर्थनार्थ झळकलेल्या पोस्टर्सवर मनसे पदाधिकाऱ्यांचेही फोटो झळकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Updated: Apr 18, 2013, 03:47 PM IST

www.24taas.com, ठाणे
ठाणे बंदच्या समर्थनार्थ झळकलेल्या पोस्टर्सवर मनसे पदाधिकाऱ्यांचेही फोटो झळकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मनसेचे ठाणे शहराध्यक्ष निलेश चव्हाण यांनी मात्र आपल्याशी चर्चा न करताच आपल्या नावाचा वापर केला गेल्याचा आरोप केला आहे.
सर्वांची नावे पोस्टवर झळकवून सरकारवर दबाव निर्माण करण्याचा हा खटाटोप असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. याबाबत आपण एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांना जाबही विचारल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर मनसेला उशिरा सूचलेलं शहाणपण असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
ठाण्यामध्ये सुरू असलेल्या बंदला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत विरोध केला आहे. त्याच वेळी मनसे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांचं नाव मात्र बंदला पाठिंबा देणाऱ्या पोस्टरवर झळकलं. त्यामुळे मनसेची बंदबाबत नेमकी भूमिका काय आहे, असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.