www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे ठाण्याचे विभाजन होणार यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत याबाबत घोषणा करणार आहे.
ठाणे विभाजनाबाबत आज होणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं होतं. याबाबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री, ठाण्याचे पालकमंत्री यांच्यासह जिल्ह्यातले आमदार उपस्थित होते. आज मंत्रिमंडळ बैठकीत ठाणे विभाजनाबाबत निर्णय घेण्यात आला. हा निर्णय विधीमंडळापुढे मांडला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
ठाण्याचे विभाजन झाल्यानंतर पालघर हा नवा जिल्हा अस्तित्वात येणार आहे. जिल्ह्याचे ठिकाण आणि मुख्यालय पालघर असणार आहे. दरम्यान, प्रशासनाच्या सोयीसाठी छोटे जिल्हे करण्याची आपल्या सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ठाणे जिल्हा विभाजनाचा प्रश्न निवडणुकीपूर्वी मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झालीये. या नव्या जिल्ह्यामुळे आदिवासींच्या समस्या सुटण्यात मदत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
नवा जिल्हा अस्तित्वात येणार असल्याने पालघरमध्ये जल्लोष करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.