आता ठाणे महापालिकेत युती-आघाडीत 'टाय'!

ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या रेखा पाटील यांनी दणदणीत विजय मिळवलाय. त्यांनी काँग्रेसच्या अरुणा भुजबळ यांचा ३२२१ मतांनी पराभव केला. तर मुंब्र्याच्या प्रभाग क्रमांक ५७ब मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वनाथ भगत विजयी झाले. त्यांनी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार अविनाश पवार यांचा पराभव केला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 2, 2013, 04:09 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, ठाणे
ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या रेखा पाटील यांनी दणदणीत विजय मिळवलाय. त्यांनी काँग्रेसच्या अरुणा भुजबळ यांचा ३२२१ मतांनी पराभव केला. तर मुंब्र्याच्या प्रभाग क्रमांक ५७ब मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वनाथ भगत विजयी झाले. त्यांनी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार अविनाश पवार यांचा पराभव केला.
कोपरी इथल्या प्रभाग ५१अ इथल्या नगरसेविका चांदनी दुलानी यांचं पद रद्द झाल्यानं या जागेसाठी काल मतदान झालं होतं. युती आणि आघाड्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीकडे मतदारांनी मात्र पाठ फिरवली. या प्रभागात फक्त ४५ टक्के मतदान झालं होतं.
आज झालेल्या मतमोजणीनंतर शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार रेखा पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांना ५४९७ मतं मिळाली, तर काँग्रेसच्या अरुणा भुजबळ यांनी २२७६ मतांपर्यंतच मजल मारली. मनसेच्या स्नेहल सुर्वे यांना ९१३ मतं मिळवून तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
दरम्यान, या निकालांमुळं ठाणे महापालिकेत युती आणि आघाडीचं संख्याबळ आता ६५ झालंय. त्यामुळं आगामी महापौरपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळेल, हे आजच्या निकालावरुन स्पष्ट झालं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.