नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच मांडला जाणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी यावर शिक्कामोर्तब केलंय. रेल्वे बजेटचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका 8 मार्चला होताहेत. त्यामुळे निवडणुकांच्या आधी अर्थसंकल्प सादर करुन सरकार मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता. विरोधी पक्षांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन निवडणूक आयोगानं त्याबाबत केंद्र सरकारकडे विचारणा केली होती.
मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांना याबाबतचं पत्र पाठवून याबाबत 10 जानेवारी पर्यंत उत्ततर देण्यास सांगितलं होतं. मात्र आत राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर 1 फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प सादर होईल यावर शिक्कामोर्तब झालंय.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होईल तर दुसरा टप्पा 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिल या कालावधीत होणार आहे.