www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
विधानसभा निवडणुकांच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया आलीय. ‘आप’च्या विजयावर त्यांनी उपरोधिक टोला लावत `झोळीवाल्यांच्या नव्या फौजा` असं म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेबसाईटवर शरद पवारांनी आपली ही प्रतिक्रिया दिलीय.
दिल्ली बलात्कारासारख्या घटनेनंतर तरुण अस्वस्थ होता. साऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळाला. ‘झाडू’ला एक संधी द्यायला हवी असं आपल्या निवासस्थानातले कर्मचारी बोलत होते, असं सांगत त्यांनी `आप`च्या लोकप्रियतेचं कौतुक केलं. मात्र याच वेळी त्यांनी `आप`ला उपरोधिक टोलाही लगावलाय.
शरद पवार म्हणतात, “दिल्लीत सरकार न स्थापण्याचा शहाणपणाचा निर्णय भाजपनं घेतलाय. त्यामुळं येते ४-५ महिने राज्यपालांचं शासन तिथं येणार असं दिसतंय. पण त्यापेक्षाही आम आदमी पार्टीला ५-६ जागा मिळून त्यांचे सरकार यायला हवे होते. कदाचित राज्यपालांच्या शासनानंतर पुन्हा निवडणुकांत त्यांचं सरकार आणण्याची संधी आम आदमी पार्टीला मिळेल. त्यांचं सरकार यावं आणि त्यांनी कांदा, भाज्या व वीज यांचे दर निम्म्यावर आणून दाखवावेच, असं मला वाटतं. तेव्हाच त्यांच्या प्रचारातला फोलपणा देशासमोर येईल. कारण या भावांवर राज्यांचं काहीच नियंत्रण नसतं. उत्पादनावर आधारित दरांचे चढउतार होत असतात, हे वास्तव आहे”.
तसंच “एकूण दिल्ली आणि अन्य राज्यांत जो निकाल लागला आहे, त्याचा काँग्रेससह आम्हा सर्वांनाच गांभीर्यानं विचार करावा लागेल. या पराभवात नवीन, तरुण पिढीच्या रागाचं प्रतिबिंब उमटलंय. ही तरुण पिढी का रागावली आहे, याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. त्याचवेळी `झोळीवाल्यांच्या नव्या फौजा`, ज्या अवास्तव कल्पना मांडत आहेत आणि त्याचा प्रभाव माध्यमे, तसेच सरकारी यंत्रणांतील काही लोकांवर पडतो आहे, त्याचाही विचार करावा लागणार आहे. खंबीर राज्यकर्ते आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची परिणामकारक अंमलबजावणी या दोन गोष्टी झाल्या तर अशा शक्ती डोके वर काढणार नाहीत. जनतेला दुबळे राज्यकर्ते आवडत नाहीत, खंबीर नेतृत्व लागतं हेही लक्षात ठेवलं पाहिजे”, या शब्दात शरद पवारांनी चार राज्यांच्या निकालाबाबत आपलं मत मांडलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.