www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘आम आदमी पार्टी’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांना दिल्ली निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावलीय. केजरीवाल यांनी निवडणुकीसाठी आयोगाकडे रजिस्टर केलेली खर्चाची रक्कम आणि प्रत्यक्षात खर्च केलेली रक्कम यात फारकत आढळल्यानं त्यांना ही नोटीस बजावण्यात आलीय.
निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, संबंधित अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. ज्यामध्ये, जंतर-मंतरवर झालेल्या संगीत कार्यक्रमाचा केजरीवाल यांनी जो खर्च दाखवलाय तो दिल्ली निवडणूक आयोगानं आपल्या रजिस्टरमध्ये नोंद केलेल्या खर्चाशी जुळत नसल्याचं सांगितलंय. निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केजरीवाल यांच्या उमेदवाराच्या खात्यात तीन लाख रुपयांचा खर्च दाखवला गेलाय. तर निवडणूक आयोगाच्या रजिस्टरमध्ये हाच आकडा १६ लाख रुपये आहे.
नोटीशीनुसार, केजरीवाल यांना लगेचच उत्तर मागितलं होतं. परंतु, त्यांनी यावर उत्तर देण्यासाठी काही दिवसांची सवलत मागितलीय कारण, ते सध्या शहरातून बाहेर आहेत.
आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय. परंतु, आपल्यावर केलेले आरोप योग्य नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय. सिसोदिया यांच्या म्हणण्यानुसार, जंतर-मंतरवर संगीत कार्यक्रम पक्षातर्फे आयोजित करण्यात आला होता आणि याचा खर्च पार्टीच्या खात्यात जोडला गेला पाहिजे, उमेदवाराच्या (केजरीवाल) नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.