www.24taas.com, मुंबई
महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये राज्यात वाढ झाली असली तरीही महिला आणि दलित मात्र राज्यात सुरक्षित असल्याचा, दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलाय.
भारतात महाराष्ट्र हे सुरक्षित राज्य असल्याचं सांगत विधान परिषदेत गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेवर उत्तर देताना ही माहिती दिलीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत महिलांच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झालीय. राज्यात १७ हजार ४४७ अत्याचाराच्या घटनांची नोंद झालीय. तरीही गृहमंत्री आर आर पाटील यांनी राज्य सर्वात सुरक्षित असल्याचा दावा केलाय. देशातल्या ५३ महानगरांपैकी सुरक्षित शहर म्हणून मुंबईचा ४८वा क्रमांक लागतो. सुरक्षित शहरांच्या यादीत मुबईचं नाव तळाला असूनही आबांनी मुंबई सुरक्षित असल्याचा दावा केलाय. देशातल्या महानगरांमध्ये वसई विरार देशात सर्वात सुरक्षित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
आबा म्हणतात...
कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काय देवा केलाय, हे पाहुयात..
महिलांवरील अत्याचारात २०१२ मध्ये किंचित वाढ
२०११ साली महिलांवरील अत्याचारांच्या १७,२०९ घटनांची नोंद
२०१२ साली महिला अत्याचारांच्या १७,४४७ घटनांची नोंद
देशात ५३ महानगरांमध्ये मुंबईत महिला सर्वात सुरक्षित
महिलांच्या सुरक्षिततेत मुंबईचा ४८ वा क्रमांक
वसई-विरारमध्ये महिला सर्वाधिक सुरक्षित, या भागाचा सुरक्षेच्या दृष्टीनं देशात पहिला क्रमांक लागतो.
देशात महाराष्ट्र राज्य दलितांसाठी सर्वाधिक सुरक्षित
राज्यात एक लाख लोकसंख्येमागे एका एट्रॉसिटीची नोंद होताना दिसते.
एक नजर टाकुयात, नजीकच्या काळात घडलेल्या काही घटनांवर
नुकताच माटुंगा रेल्वे वर्कशॉपजवळ एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता.
काही दिवसांपूर्वी दादरमध्ये स्वतःची बायको समजून एका तरुणीवर माथेफिरुनं चाकूहल्ला केला.
भंडारा जिल्ह्यातल्या मुरमाडी गावात तीन सख्या बहिणीची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास अजुनही लागलेला नाही. त्यांचे मारेकरी अजूनही मोकाटच आहेत.
अहमदनगरमध्ये काही दिवसांपूर्वी एका दलित महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली. तरीही आबांना महाराष्ट्र सुरक्षित वाटतोय.