'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा

चांगले स्थळ. उच्च शिक्षण. मोठ्या पगाराची नोकरी. मुंबईच्या मध्यभागी मोठे घर. परदेशात व्यवसाय. असं जर स्थळ मुलीसाठी आले तर! कोणत्याही मुलीच्या वडिलांना ते पसंत पडणार नाही का? मात्र, बनावट प्रोफाईल तयार करुन 'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा घातल्याचे उघड झालेय.

Updated: Oct 9, 2014, 03:56 PM IST
'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा title=

मुंबई : चांगले स्थळ. उच्च शिक्षण. मोठ्या पगाराची नोकरी. मुंबईच्या मध्यभागी मोठे घर. परदेशात व्यवसाय. असं जर स्थळ मुलीसाठी आले तर! कोणत्याही मुलीच्या वडिलांना ते पसंत पडणार नाही का? मात्र, बनावट प्रोफाईल तयार करुन 'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा घातल्याचे उघड झालेय.

या प्रकरणी सायबर सेलने किरण बागवेला अटक केली आहे. 'शादी डॉट कॉम' या ना संकेतस्थळावर बनावट स्थळ तयार करून एक-दोन नव्हे, तब्बल २३ तरुणींना फसविले. आपण आयटी कंपनीत अभियंता पदावर काम करतो, दौऱ्यामुळे सतत मुंबईबाहेरच असतो वगैरे भूलथापा दिल्यात. आपल्याऐवजी सुंदर दिसणाऱ्या मित्राच्या छायाचित्राचा गैरवापर करत किरणने शादी डॉट कॉमवर बनावट प्रोफाइल तयार केले होते. 

भूलथापांचे अनेकानेक हातखंडे वापरून प्रोफाइल तयार करणाऱ्या किरणला तब्बल १२३६ मुलींनी पसंती दिली होती. एका खासगी कंपनीत उच्चपदावर काम करणाऱ्या एका मुलीच्या प्रोफाइलवर किरणने 'लाइक' केले. तरुणीनेही त्याच्याशी संपर्क वाढविला. आपण प्रेमात पडलो असून आता लग्न करीन तर तुझ्याशीच, असे बागवेने भासविले. कुटुंबीयांशी बोलण्याचीही तयारी दाखविल्याने या तरुणीने विश्वास ठेवला. काही दिवसांनी बागवेने फोन करून आजारी पडलो आहोत. परंतु मित्राला जामीन राहिल्याने आपले बँक खाते गोठविण्यात आल्याचे सांगून संबंधित तरुणीकडून पैसे उकळले. 

सतत काही ना काही कारणे सांगून सुमारे दीड लाख रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले. अखेर या तरुणीने सायबर सेल पोलीस ठाण्याकडे तक्रार दाखल केली. वरिष्ठ निरीक्षक नंदकिशोर मोरे, निरीक्षक सुनील घोसाळकर, सहायक निरीक्षक प्रकाश वारके, उपनिरीक्षक साधना बेलगावकर यांच्या पथकाने गेले अनेक महिने तपास करून त्याला अटक केली.

बारावी अनुत्तीर्ण असलेल्या किरणने आतापर्यंत जे मोबाइल  वापरले ते फसवणूक झालेल्या मुलींच्या नावावर घेतल्याचे आढळून आल्याने त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र मोठय़ा शिताफीने पाठपुरावा करीत बागवेला नागपूर येथे अटक करण्यात आली. बागवेने आतापर्यंत तब्बल २३ तरुणींना गंडविले असून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत, यापैकी नऊ तरुणींनी तक्रार दाखल केली आहे. पुणे, लोणावळा येथे गुन्हे दाखल झाले आहेत. फसवणूक झालेल्या तरुणींनी सायबर सेल पोलीस ठाण्याशी २६५०४००८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त(गुन्हे) सदानंद दाते यांनी केले आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.