मुंबई : आज अनेक स्मार्ट फोन हे अँड्रॉइड सिस्टीमवर असतात. मोबाइल वापरणाऱ्यांची एक महत्त्वाची समस्या असते ती सारखी मोबाईलची बॅटरी लो होण्याची. बरेचसे अँड्रॉइड युझर्स या समस्येतून दररोज जात असतात. यातून सुटका होण्यासाठी काही टीप्स
१. स्क्रीनचा ब्राइटनेस कमी करा
तुमचा फोन कधीही ऑटो ब्राइटनेस मोडवर वापरू नका. हे फीचर तुमच्या फोनचा ब्राइटनेस जास्त ठेवू शकतं. आजकाल येणारे फोन्सचे स्क्रीन रेझोल्युशन जास्त असते. जास्त ब्राइटनेस ठेवल्यास त्यात सर्वात जास्त बॅटरी वापरली जाते. म्हणून मोबाइलचा ब्राइटनेस कमीत कमी ठेवा.
२. स्क्रीनच्या टाइम आऊटची वेळ कमी करा
स्क्रीन टाईम आऊटची वेळ जितकी जास्त तितकी बॅटरी जास्त वापरली जाण्याची शक्यता असते. म्हणजेच फोन वापरुन झाल्यावरही उगाच स्क्रीन ऑन राहते. त्यामुळे साधारण हा टाईम आऊटची वेळ १५ सेकंद ठेवा.
३. रेडिओ सिग्नल वापरणाऱ्या सर्व सुविधा बंद ठेवा
जीपीएस, लोकेशन डिटेक्टर, वाय फाय, ब्ल्यूटूथ या सर्व सुविधा गरज नसेल तेव्हा बंद करुन ठेवत जा. कारण, या सुविधा वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅटरी खर्च होते. तुमचे जीपीएस वरील लोकेशन हाय अॅक्युरसी मोडवर असेल तर त्यात मोबाईलचे नेटवर्क, जीपीएस या सर्व सुविधा एकाच वेळी वापरल्या जातात. त्यामुळे या सुविधा बंद करुन ठेवणे सोयीस्कर आहे.
४. व्हायब्रेशन बंद करा.
मोबाइलचे व्हायब्रेशन हे बॅटरी उतरण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. काही कीबोर्ड हे प्रत्येक बटन प्रेस केल्यावर फोन व्हायब्रेट करतात. अशावेळी किबोर्डच्या सेटिंग्समध्ये जाऊन किबोर्ड व्हायब्रेशन बंद केल्याने बॅटरी वाचू शकते.
५. फेसबूक आणि फेसबूक मॅसेंजर सारखी अॅप्स काढून टाका
फेसबूक आणि फेसबूक मॅसेंजर ही अॅप्स मोठ्या प्रमाणावर बॅटरी वापरतात. तुम्ही कुठे जाता, त्यावरुन तुमच्या फोन वर जाहिराती देण्याचे काम तुमच्या अपरोक्ष फेसबूक करत असते. या सगळ्यात प्रचंड प्रमाणात बॅटरी वापरली जाते. त्यामुळे फेसबूकच्या अॅप ऐवजी मोबाइल ब्राऊजरमधून फेसबूक वापरण्याला पसंती द्या. दोन्हीतून मिळणाऱ्या सुविधा साधारण सारख्याच आहेत.
६. तुमचं लोकेशन वापरणाऱ्या अॅप्सचा वापर कमी करा
तुमचं लोकेशन वापरणारी अॅप्स नुसतीच तुमच्या मोबाइलची भरमसाठ बॅटरी वापरत नाहीत, तर तुमच्या प्रायव्हसीलाही धोका पोहोचवतात. अशा अॅप्सचा वापर जितका शक्य आहे तितका कमी करा. अनेक अॅप्स बरेचदा तुमच्या नकळत तुमचे लोकेशन वापरतात आणि यात बॅटरी खर्च होते.
७. काळ्या रंगाच्या थीमचा वापर करा
अॅमोलेड स्क्रीन्सच्या फोनमध्ये जेव्हा काळा रंग वापरायचा असतो तेव्हा रंग येण्याऐवजी मोबाईलचे पिक्सेल्स बंद होतात. असे पिक्सेल्स बंद झाल्याने मोबाईलच्या बॅटरीची बचत होते. त्यामुळे त्याला सुसंगत अशा थीम्स तुम्ही ऑनलाईन डाऊनलोड करू शकता.
ज्यांच्या मोबाईल फोनची स्क्रीन एलसीडी डिस्प्लेची आहे त्यांनी अॅक्टिव्ह (अॅनिमेटेड) वॉलपेपर वापरणं टाळा. ते दिसायला जरी छान दिसत असले तरी मात्र ते मोठ्या प्रमाणात बॅटरी वापरतात.
८. ऑटो सिंकचा पर्याय बंद करा
गरज नसताना आपले इ - मेल्स, कॅलेंडर मधील गोष्टी, काँटॅक्ट या सर्व गोष्टी आपल्या अपरोक्ष सिंक होत असतात. या सिंक होण्याची आपल्यातील अनेकांना खरं तर काहीच गरज नसते, पण तरी हे घडत असतं. या सर्व सेवा पुरवण्यात मोठ्या प्रमाणात बॅटरी खर्च होते. त्यामुळे या सेवा बंद करुन ठेवत जा. त्यासाठी सेटिंगमध्ये जा, पुढे अकाऊंट मध्ये जा, त्यात गूगलमध्ये जाऊन गूगल अकाऊंटमध्ये जा आणि गरज नसलेल्या सर्व सेवा बंद करुन टाका.