नवी दिल्ली: फेसबुकचा सर्वेसर्वा सध्या भारत दौऱ्यावर आहे. आयआयटी दिल्लीमधील टाऊन हॉलमध्ये मार्क झुकरबर्गचं प्रश्नोत्तराचं सेशन झालंय. यात झुकरबर्गनं विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिलीत.
सातत्यानं येणाऱ्या 'कॅण्डी क्रश'च्या रिक्वेस्टनी वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी आपली खंत थेट झुकरबर्गसमोर मांडली. कॅण्डी क्रशची रिक्वेस्ट कशी रोखायची? असा सवाल दिल्ली आयआयटी टाऊनहॉलमध्ये विद्यार्थ्यांनी मार्क झुकरबर्गला विचारला. विद्यार्थ्याच्या या प्रश्नामुळं हॉलमध्ये सर्वत्र हशा पिकला. मात्र आम्ही याबाबत लवकरच उपाय शोधू, असं झुकरबर्ग म्हणाला.
भारतातील अधिकाधिक लोकांना जोडणं महत्त्वाचं आहे. भारतात फेसबुक युझर्सची संख्या मोठी आहे. फेसबुक वापरण्यामध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोट्यवधी लोकांना ऑनलाईन आणण्यासाठी मी उत्सुक आहे, असं झुकरबर्ग म्हणाला.
त्यापूर्वी, मार्क झुकरबर्गनं भारतात आल्यावर पहिले जगप्रसिद्ध ताजमहालला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे सात सहकारीही होते.
"एका कार्यक्रमासाठी भारतात आलो असून, सध्या ताजमहाल पाहत आहे. ताजमहाल पाहण्याची माझी अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली आहे,' असं त्यानं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. या पोस्टनंतर सात मिनिटांच्या आत त्यावर दोन हजार जणांनी कमेंट केली, बावीस हजार जणांनी लाइक केलं आणि ४३५ जणांनी ती पोस्ट शेअर केली.
झुकरबर्गनं सांगितलेली महत्त्वाच्या बाबी-
- मी विद्यार्थी दशेत असताना फेसबूकची निर्मिती करण्यास सुरूवात केली होती, तेव्हा माझ्याकडून असंख्य चुका झाल्या, ती एक ट्रायल आणि एरर प्रोसेस होती - मार्क झुकेरबर्ग
- चांगला संवाद साधू शकेल असा कॉम्प्युटर निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत - मार्क झुकेरबर्ग
- नेट न्युट्रॅलिटी हा अतिशय महत्वाचा विषय असून Internet.orgचा नेट न्युट्रॅलिटीला संपूर्ण पाठिंबा आहे. - मार्क झुकेरबर्ग
- कँडीक्रशच्या रिक्वेस्ट कशा टाळायच्या? त्यावर काही उपाय आहे का असे विचारले असता हा प्रश्न लवकरात लवकर सुटेल असे आश्वासन दिले.
- भारताशी जोडलं गेल्याशिवाय जगाशी जोडलं जाण अशक्य. जगात वेगानं विस्तार करण्यासाठी जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचणं आवश्यक - मार्क झुकेरबर्ग
- फेसबुक कम्युनिटी रँकिंगमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे - मार्क झुकेरबर्ग
- फेसबूकसाठी भारत ही अतिशय मोठी आणि महत्वाची बाजजारपेठ आहे. लोकांना एकमेकांशी जोडणं हेच आमचं उद्दिष्ट आहे - मार्क झुकेरबर्ग
- भारतात येऊन मी अतिशय उत्साहित आहे, इथं लोकांमध्ये खूप एनर्जी आहे - मार्क झुकेरबर्ग
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.