कोईम्बतूर : (जयवंत पाटील, झी २४ तास) सध्या व्हॉटसअॅपवर एका गाडीच्या दारातून पैशांची बंडलं, काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ वरळीचा, ठाण्याचा, नागपूर, पुण्याचा असल्याचं व्हॉटसअॅपकर लिहितात. जो-तो ज्याच्या त्याच्या सोईप्रमाणे अफवा पसरवतोय.
मात्र आम्ही या मागचं सत्य शोधून काढलं आहे. हा व्हिडीओ आमच्या तपासणीत जुना असल्याचं समोर आलं आहे. ही घटना नोटबंदी काळातली नाही तर, ही घटना ८ जानेवारी २०१५ ची तामिळनाडूतील शहर कोईम्बतूरची आहे.
तामिळनाडूची एक कार केरळमध्ये जात असताना, या गाडीची टक्कर एका बसशी झाली आणि दरवाजा तुटला. मात्र दार उघडल्याने यातून नोटांच्या गड्डया बाहेर पडत होत्या.
यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांना बंडलं पळवली होती. आयकर विभाग आणि पोलिसांनी हे पैसे मोजले तेव्हा, या गाडीत ३ कोटी रूपयांच्या आसपास पैसे होते. या गाडीत २ प्रवासी होते, त्यांच्यासह ड्रायव्हरला अटक करण्यात आली होती. ही गाडी केरळला जात होती.