रमेश जोशी
असिस्टंट प्रोड्युसर, झी २४ तास
कर्णकर्कश आवाज करीत लोकल स्टेशनमध्ये शिरली आणि तोफेतून गोळा जसा बाहेर पडावं तसा मी लोकलच्या डब्यातून बाहेर फेकला गेलो. कामावरुन परतलेल्या मुंबईकरांमध्ये स्टेशनवर उतरताना एवढा जोश कुठून येतो? हा खरंच संशोधनाचा विषय आहेत. सैनिक जसे कामगिरीवर जाताना हेल्मेट सावरत जातात तसा मी हातातली बॅग सावरत रेल्वे स्टेशनबाहेर पडलो. रिक्षा स्टँड परिसरात आलो. तिथं कर्रकर्र आवाज करीत रिक्षा निघून चालल्या होत्या. रिक्षाचालक तुच्छ नजरेनं माझ्यासारख्या अनेक बापुड़्या लोकांकडं पाहत होतो. लोक हात हलवून थांबवण्याचा इशारा करीत होते. रिक्षावाले मिजासीनं नजरेनंच विचारत होते... कुठं... कुठं... सुखसागर म्हटलं... तर ते अगदीच तुच्छतेनं पाहत पुढं जात होतं. जसं काही हे फुकटचं नेणार आहेत. असो… एक रिक्षावाला आला. त्याच्या रिक्षात रिक्षावाला धरुन चार जण बसले होते. या फुटकळ माणसाला रिक्षात घेऊन त्याच्यावर उपकार करतोय या आविर्भावात त्यानं मला एका बाजूला बसवून घेतलं. बुडाची एक बाजू तिथं राहिली होती. तशा टांगलेल्या अवस्थेतच सहा जणांनी फुल्ल भरलेली रिक्षा कर्रकर्र आवाज करीत निघाली. सोसायटीजवळ येऊन रिक्षा थांबली. खिशातून पन्नासची नोट काढली. रिक्षावाल्याला पन्नासची नोट दिसताच त्याचा हिटलरच झाला. तो माझ्यावर खेकसलाच ‘अहो आठ रुपये सुट्टे नव्हते तर पायी यायचं... उगाच आमच्या डोक्याला कशाला ताप देता.’ सोसायटीसमोर तमाशा नको म्हणून स्वतःच्या हातानं स्वतःची अंगझडती घेतली. चिल्लर शोधून काढली आणि त्याच्या हातावर टेकवली. त्यावरही त्याने आहेत तरी सुट्टे पैसे ही लोकं लवपून ठेवतात, असं म्हणून रिक्षा पुढं दामटली.
सोसायटीचा गेट उघडल्या उघडल्या भटक्या कुत्र्यांनी भोभो करुन स्वागत केलं. सोसायटीतल्या खाष्ट लोकांना पाहून एरव्ही धूम पळणारी कुत्री माझ्यासारख्याकडं पाहून उगाचच भुंकतात... कदाचित भुंकण्याचा सराव करीत असावेत... चार मजले चढून गेल्यावर माझं घरं लागतं.... अरे माझं का म्हणतो... मी त्या घराला... सॉरी माझ्या बायकोचं घर... बायकोच्या घरात मी भाडेकरु म्हणून राहतो, अशी ती मला वागवते. बेल वाजवल्यानंतर सेल्समनसारख्या अगंतूकाकडं जसं पाहतात तसा कटाक्ष तीनं टाकला. घरात प्रवेश करता झालो. नवरा थकून भागून घरी आल्यावर बायको प्रेमानं त्याला चहा आणि पाणी देते हे दाखवणाऱ्या सिनेमावाल्यांच्या आणि सीरियलवाल्यांच्या मोजून पैजारा माराव्यात. ती कधीच चहा काय पाणीसुद्धा विचारीत नाही. स्वतःच जाऊन फ्रिज उघडला. पाण्याची बाटली घेतली. थंड झालेला चहा कपात ओतून घेतला आणि हॉलमध्ये येवून बसलो. बायको राधा ही चावरी... उंच माझा... मला सासू... अशा सिरीयल पाहत बसली होती. या सीरियलच्या ब्रेकमध्ये ती स्वयंपाक करीत असते. तर असो... तिचं सीरियल पुराण संपल्यानंतर टीव्हीचा दूरनियंत्रक म्हणजे रिमोट हातात आला... तोपर्यंत रात्रीचे दहा वाजून गेलेले होते. माझ्यासारख्या सामान्य माणसाचं जग जाणून घेण्याचं माध्यम म्हणजे वृत्तवाहिन्या... सध्या मराठीत बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचंही पीक आलंय. सह्याद्रीच्या त्या निस्तेज बातम्या पाहून वाढलेल्या आमच्या पिढीला या खासगी वृत्तवाहिन्यांच्या बातम्या अधिकच जवळच्या वाटतात. बातम्या सुरुच होत्या... राज्याच्या बड्या नेत्यानं उपस्थित केलेल्या ‘लघु’शंकेनंतर त्यांना आत्मक्लेश झाला होता. दादा नेत्यानं काय करावं... थेट काकांच्या गॉडफादर असलेल्या दिवंगत नेत्याचा समाधीसमोरच ते आत्मक्लेश म्हणून दिवसभर बसले. बस्स सगळ्या टीव्ही चॅनलला त्या आत्मक्लेशाचा ओव्हरडोस झाला होता. चॅनलवरच्या त्या बायका आणि पुरुष तावातावाने बोलत होते. हातवारे करुन त्या दादाच्या आत्मक्लेशाचं सांगत होते. झाडून सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांवर तेच ते सुरु होते. एरव्ही मारकुट्या वळूसारखा चेहरा करुन फिरणाऱ्या दादाचं ते समाधीसमोर निर्विकार बसणं पाहून गलबलल्यासारखं झालं. सोफ्यावर अंग टाकून पडलो होतो. चॅनलवर त्या बातम्यांचा ढ्या... ढ्या... सुरु होता. तेवढ्यात कधी डोळा लागला कळलं नाही.
सकाळी बायकोच्या मंजूळ आवाजानं जाग आली. असा आवाज फक्त लग्नानंतर पहिल्या काही महिन्यांतच ऐकला होता. अहो उठा... सात वाजले... अंघोळीला पाणी काढलयं. ऑफिसला जायची वेळ झाली. याची मला सवय नव्हती... लग्नाचे नवे दिवस सोडले तर हा अनुभव माझ्यासाठी सुखद धक्काच होता. आंघोळ उरकली... या धक्कातून सावरतो ना सावरतो तो आणखी ए