अजिंठा- भाषा,जात,काळाची सीमा ओलांडणारी एक ‘अव्यक्त’ डोळस कहाणी...खरंच नितीन देसाईंच्या दिग्दर्शनातून काहीही ‘व्यक्त’ होत नाही. त्यामुळं ना. धो. महानोरांच्या अजरामर कलाकृतीवर आधारलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या हाती लागतो, तो एक ‘माकडां’चा (‘सुंदर’ या अर्थानं मुळीच नाही) खेळ. त्यांनी दिग्दर्शनाच्या भानगडीत न पडता केवळ कलेचंच दिग्दर्शन केले तर ते त्यांच्या आणि चित्रपटांच्या दृष्टीनंही हिताचं होईल. बुद्धकालीन चित्रकला प्रसाराच्या निमित्तानं जन्माला आलेल्या प्रेम(सत्य)कथेचे सादरीकरण दिग्दर्शकाला मुळीच पेलवलेले नाही.
चित्रपटात रॉबर्ट-पारोच्या प्रेमकथेचा आधार घेऊन बुद्धाचे तत्वज्ञान सांगायचे आहे की, बुद्धाच्या तत्वज्ञानातून प्रेम याचा मोठा गोंधळ उडालेला दिसतो. रॉबर्ट आणि पारोची प्रेमकथा सांगण्यासाठी दिग्दर्शकाला गाण्यांची मोठ्या प्रमाणावर मदत घ्यावी लागणं हेच चित्रपटाचं अपयश आहे. त्यांच्यात जो काही भाषिक पातळीवरचा थोडाफार संवाद आहे तो देखील तेवढ्या तीव्रतेनं प्रकट होऊ शकलेला नाही. ठीक आहे आपण गृहीत धरू की भाषेच्या अडचणीमुळे रॉबर्ट आणि पारोमध्ये योग्य संवाद होऊ शकत नाही आणि त्यामुळेच पारोच्या मनातील प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गीतांचा भडीमार केला. मात्र हे केवळ पारोच्याच बाबतीत घडताना दिसतं रॉबर्टच्या नव्हे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली स्वतंत्र भाषा आणि संस्कृती जपणाऱ्या पारोच्या तोंडून संपूर्ण चित्रपटातून एकदाही बोली भाषेतील गाण्यातून रॉबर्टविषयीच्या भावना व्यक्त होताना दिसत नाही. ते झाले असते तर चित्रपटाला आणखी अस्सल देशी टच आला असता.
नितीन देसाई आणि कला दिग्दर्शन काय बोलावे? ऐतिहासिक चित्रपटांमधील (लगान,जोधा-अकबर) त्यांचं कला दिग्दर्शन म्हणजे प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असते. मात्र स्वत:च्याच चित्रपटात कलादिग्दर्शन करताना त्यांची दमछाक झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. दिग्दर्शनाची बाजू सांभाळताना त्यांचा जो गोंधळ उडालेला आहे, त्याची छाप त्यांच्या कला दिग्दर्शनावरही दिसून येते. त्यामुळं दिग्दर्शनासह कला दिग्दर्शनाच्या आघाडीवरही हा चित्रपट पूर्णपणे कोलमडला आहे. एका दृश्यात तर रॉबर्ट चक्क समुद्र किनाऱ्यावर उभा आहे की काय असाच भास होतो (अजिंठ्याला असं काही असतं तर जायकवाडी प्रकल्प बांधण्याची गरजच निर्माण झाली नसती). चित्रपट सत्य कथेवर आधारलेला असूनही वास्तवाचे भान हरवल्याचे जाणवते. उत्तम कला दिग्दर्शनाचा आणखी एक नमुना म्हणजे रॉबर्टच्या पेंटिंग्स प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेला ब्रिटनमधील क्रिस्टल पॅलेस. या पॅलेसपेक्षा ताज हॉटेलमधील क्रिस्टल बॉल रूम अधिक भव्य आणि दिव्य आहे. कॅमेऱ्यातून अजिंठ्याच्या लेण्यांचं सौंदर्य आणखीन योग्य पद्धतीनं चित्तारता आलं असतं. मात्र ते न जमल्यानं कला आणि सौंदर्याचे लेणे अजिंठ्यापासून दूर असल्याचं शेवटपर्यंत जाणवत राहतं.
अभिनयाच्या आघाडीवरही चित्रपटाची झेप तोकडीच आहे. सोनाली कुलकर्णीनं ज्या ताकदीनं नृत्य सादर केलं आहे, त्याच ताकदीनं अभिनय केला असता तर चित्रपटासह पारोवरही अन्याय झाला नसता. सोनालीच्या भूमिकेची लांबी जास्त असूनही पारोपेक्षा फिलिपने साकारलेला रॉबर्ट अधिक ताकदीचा वाटतो. त्याचा अखेरचा पाच मिनिटांचा मूक अभिनय अक्षरश: अंगावर येतो. अखेर निष्कर्ष काय तर अखेरचा पाच मिनिटांचाच चित्रपट पाहण्यासारखा आहे.
ताक....* ही समीक्षा नव्हे एका प्रेक्षकाचा संताप आहे