ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना अत्यंत मानाचा समजला जाणार ‘गदिमा’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लालन सारंग यांना ‘गृहिणी सखी सचिव’ तर शिक्षणतज्ञ रावसाहेब कसबे यांना ‘स्नेहबंध’ आणि मोनिका गजेंद्रगडकर यांना ‘चैत्रबन’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. गदिमा प्रतिष्ठानचे आनंद माडगुळकर यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पुण्यात १४ डिसेंबर रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
बाल रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि व्यवसायिक रंगभूमी तसंच सिनेमा, दूरचित्रवाणी आणि लेखन अशा क्षेत्रांमध्ये आपला स्वत:चा ठसा दिलीप प्रभावळकरांनी उमटवला आहे. एक झूंज वाऱ्याशी, कलम ३०२ आणि नातीगोती यासारख्या नाटकांमधील गंभीर भूमिका प्रभावळकरांनी जीवंत केल्या. लालन सारंग यांनी गेली ३५ वर्षे व्यवसायिक रंगभूमीवर अनेक भूमिका अजरामर केल्या त्यात सखाराम बाईंडर, रथचक्र, जंगली कबूतर, कमला यासारख्या मैलाचा दगड ठरलेल्या नाटकांचा समावेश आहे. आर्त आणि भूप या कथासंग्रहांच्या लेखनाने मोनिका गजेंद्रगडकर यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. रावसाहेब कसबे हे लोकशाही समाजवादी विचारवंत आहेत आणि त्यांनी झोत या पुस्तकात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विचारसरणीची समीक्षा केली आहे.