किंग खानच्या विरोधात एफआयआर नाही

अग्निपथच्या पार्टीत फराह खानचा नवरा शिरीष कुंडरला किंग खानने कानफटवल्याच्या बातमीने अवघं बॉलिवूड हादरलं आहे. किंग खानचा तोल कशामुळे ढळला असावा यावरुन तर्ककुतर्क लढवण्यात येत आहे. पण शिरीष कुंडरने आपण शाहरुखच्या विरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवणार नसल्याचं म्हटलं आहे.

Updated: Jan 31, 2012, 04:50 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

अग्निपथच्या पार्टीत फराह खानचा नवरा शिरीष कुंडरला किंग खानने कानफटवल्याच्या बातमीने अवघं बॉलिवूड हादरलं आहे. किंग खानचा तोल कशामुळे ढळला असावा यावरुन तर्ककुतर्क लढवण्यात येत आहे. पण शिरीष कुंडरने आपण शाहरुखच्या विरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवणार नसल्याचं म्हटलं आहे. आता आधीच किंग खानने रागाच्या भरात बदडल्याचा चांगलाच धसका शिरीष कुंडरने घेतला आहे. परत एकदा पोलिस स्टेशनची पायरी चढून किंग खानचा रोष कशाला ओढावून घ्या असाही विचार शिरीष कुंडरने केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

एकेकाळी फराह खान शाहरुख खानची जिगरी दोस्त होती. पण कुंडरच्या जोकर या सिनेमात काम करायला शाहरुखने नकार दिल्यानंतर आपसात बिनसलं. आता तर मारहाणी पर्यंत प्रकार गेल्याने किंग खान आणि फराह खान यांचे संबंध जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहेत. कुंडरने किंग खानच्या रा-वन या सिनेमाबद्दल केलेल्या ट्विटमुळे शाहरुख भडकला आणि त्याने अग्निपथच्या पार्टीत कुंडरला चांगलं बदडून काढल्याची चर्चा जोरात सुरु आहे. आता कुंडरला हा शहाणपणा करायची गरज होती का? आणि कुंडरने देखील एकापेक्षा एक भिकार सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. त्याला शाहरुखच्या रा-वन विषयी टिपण्णी करण्याची काय आवश्यकता. पण विनाशकाले विपरीत बुध्दी म्हणतात ते खरं.

 

व्यक्तिगत जीवनातील किंवा व्यवसायिक चढउतारांमुळे शाहरुख खानचा तोल ढळला असावा आणि त्यामुळेच त्याने शिरीष कुंडरला कानवफटवलं असावं असं मत फराह खानने व्यक्त केलं आहे. शारीरिक मारहाण करणं हे एकाद्या गोष्टीची तड लावण्याचं सर्वात वाईट मार्ग असल्याचं एकदा शाहरुखने मला सांगितलं होतं आणि आता तो तेच करत असल्याचं पाहून मला अतिशय दु:ख होतं आहे. जेंव्हा एकादी व्यक्ती अशा प्रकारे मारहाणीचा मार्ग पत्करते तेंव्हा ती व्यक्तिगत जीवनात किंवा व्यवसायिक कारकिर्दीतील वाईट कालखंडातून जात असावी असं फराह खानचं म्हणणं आहे.

 

आता किंग खानच्या व्यक्तिगत जीवनात अशी कोणती वावटळ घोंगावत असावी यावरुन अफवांचा बाजार गरम आहे. गेल्या काही दिवसात किंग खानचे नाव प्रियांका चोप्रा सोबत जोडण्यात आलं आहे. त्यामुळे सौ. गौरी खान यांनी अबोला तर धरला नसावा ना अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे.