झी 24 ताससाठी सिंधुदुर्गहून विकास गावकर
सिंधुदुर्गात आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा फड रंगू लागलाय.... जिल्ह्यातले सर्वशक्तीमान नेते नारायण राणेंविरोधात सर्वपक्ष असंच यावेळच्या लढ्याचं स्वरुप असेल.....
मालवणी मुलखात नगर पालिकांची रंगलेली लढाई अख्या महाराष्ट्रात गाजली. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजप शिवसेनेला सोबत घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोन नगरपालिकांमध्ये राणेंना धोबीपछाड दिली. तर मालवण नगरपालिकेत जवळपास गेलेली सत्ता राणेंनी मिळवली. नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम शांत होतो न होतो तोच आता झेडपीचा आखाडा सुरू झालाय.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये गेल्या वेळी राणेंनी विरोधकांचा सफाया करत काँग्रेसला 50 जागांपैकी तब्बल 42 जागा मिळवून दिल्या होत्या. राष्ट्रवादीला 6 आणि शिवसेनेला दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळच्या निवडणुकीत झेडपीतही राणे विरुद्ध सर्वपक्षीय असाच सामान रंगण्याची शक्यता आहे.
नगरपालिका निवडणुकीतल्या अपयशानं राणे अधिक सावध झालेत. त्यातच शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात राणेंची ताकद अधिक आहे. त्यामुळं सर्वपक्षीय विरोधकांना राणेंची झेडपीतली सत्ता उलथवून टाकणं सहज शक्य नाही.... राणेंबरोबरच्या लढाईत विरोधक किती यशस्वी होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.