दिवाळीची 'भेट', ए.राजांना 'जन्मठेप'?

टु जी घोटाळ्यात ए राजा आणि कनिमोळींसह 17 आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले, राजांवरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना जन्मठेप होऊ शकते, नवी दिल्लीच्या पटियाला कोर्टानं हे सर्व आरोप मान्य केलेत.

Updated: Oct 22, 2011, 08:15 AM IST

झी 24 तास वेब टीम, नवी दिल्ली

 

टु जी घोटाळ्यात ए राजा आणि कनिमोळींसह 17 आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले, राजांवरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना जन्मठेप होऊ शकते, नवी दिल्लीच्या पटियाला कोर्टानं हे सर्व आरोप मान्य केलेत. त्यानुसार माजी टेलिकॉम मंत्री ए राजासह 6 आरोपींवर कलम 409 लावण्यात आले आहे. तर डीएमके खासदार कनिमोळींवर कलम 120 लावण्यात आले आहे. या कलमानुसार कनिमोळीना पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते.

 

या घोटाळ्यातील आणखी एक आरोपी शाहिद बलवावरही आरोप निश्चित करण्यात आला आहे. तर रिलायन्सच्या तीन अधिका-यांवरही पटियाळा कोर्टानं आरोप निश्चित केलेत. त्यांच्यावर घोटाळ्यात षडयंत्र रचल्याचा आरोप करण्यात आलाय. कोर्टाच्या या आरोप निश्चितीला हे आरोपी हायकोर्टात आव्हान देणार आहेत. दरम्यान, डीएमके खासदार कनिमोळींच्या जामीन अर्जावर 24 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

 

माजी मंत्री ए राजा आणि द्रमुकच्या खासदार कनिमोळी, शाहीद बलवासह 17 जणांवर 2G स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी कोर्टानं आज आरोप निश्चीत केलेत. CBI चं हे मोठं यश मानलं जातंय. CBI नं या सर्व आरोपींवर विश्वासघात आणि घोटाळ्यात षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. या सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी CBI नं कोर्टात केली होती.

 

स्पेक्ट्रम घोटाळ्यात तिहार जेलमध्ये असलेल्या या आरोपींपैकी संजय चंद्रा, यूनीटेक गौतम दोषी, हरि नायर, सुरेंद्र पिपारा, करिम मोरानी, शरद कुमार यांच्या सोबत 17 आरोपींवर आज आरोप निश्चीत करण्यात येणार आहेत. तसचं आणखी काही आरोपांबाबत सीबीआय आज दुसरे आरोपपत्रही दाखल करणार आहे.  या सर्व आरोपांच्या बाबत आज कोर्टात सुनावणी होणार आहे.  आरोप निश्चित झाल्यानंतर या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होईल.  कोर्टानं  सीबीआयने दाखल केलेल्या आरोपांना मान्यता दिल्यास राजा सह अन्य आरोपी जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र होऊ शकतील.  या आऱोपत्रांच्या सुनावणीनंतरच या आरोपींच्या जामिनाबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे.