www.24taas.com, नवी दिल्ली
कर्नाटक आणि राजस्थानमधील पक्षांतर्गत कुरबुऱ्या आणि केंद्रातले हतबल युपीए सरकार या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षाची मुंबईत येत्या २४ आणि २५ मेला राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होत आहे. पण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा या बैठकीला उपस्थित रहाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्य़क्ष नितीन गडकरी ह्यांना मूदतवाढ देण्याचा निर्णय जरी या बैठकीत होणार असला तरी तो सर्वानुमते असेल का याबाबतची चर्चा सुरु झाली आहे.
तब्बल ९ वर्षानंतर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक २४ , २५ मे ला मुंबईत होते. राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचा पुन्हा आशिर्वाद मिळाल्याने नितीन गडकरी ह्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची टर्म वाढवून मिळणार आहे. त्यासाठी भाजपाच्या घटनेत बदल केला जाणार आहे. तसंच ४०० सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या या बैठकीनंतर भाजपकडून देशातल्या राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी आक्रमक हालचाली होतील असं पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.
नरेंद्र मोदी आणि येडीयुरप्पा हे या बैठकीत अनुपस्थित रहाणार अशी चर्चा आत्तापासून सुरु आहे. नुकतंच राजस्थानमधील विजयाराजे सिंदिय़ा ह्यांचे बंड शमवण्यात यश आलं असलं तरी पक्षामध्ये सर्वच आलबेल असल्याचं यावरुन अधोरेखित झालं आहे. विविध राज्य़ातील पक्षाच्या कटकटी आवरतांना महाराष्ट्रातील पक्षाचं स्थान बळकट करण्याचं आवाहनही राष्ट्रीय कार्यकारणीपुढे आहे.