येडियुरप्पा पुन्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री?

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बी.एस.युदियुरप्पा यांची पुर्नस्थापना केली जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंबंधीची घोषणा येत्या २४ तासात केली जाईल.

Updated: Mar 21, 2012, 04:28 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बी.एस.युदियुरप्पा यांची पुर्नस्थापना केली जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंबंधीची घोषणा येत्या २४ तासात केली जाईल. येदियुरप्पा यांनी पार्टी हायकमांडला ४८ तासांची मुदत दिली होती. येदियुरप्पा समर्थकांनी गौडा यांना अर्थसंकल्प सादर करण्यापासून रोखण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयार दाखवली आहे.

 

पक्षाच्या नेतृत्वाला माजी मुख्यमंत्री येदियुरप्पांनी उघड आव्हान दिलं असलं तरी पक्ष सोडण्याची त्यांची तयारी नाही. कर्नाटक उच्च न्यायालयाने बेकायदेशी खाण प्रकरणात त्यांना क्लिनचीट दिल्यानंतर त्यांनी पक्षावर दबाव टाकायला सुरुवात केली. पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सोबत बैठकीसाठी येदियुरप्पा बुधवारी सांयकाळी दिल्लीत दाखल होणार आहेत. येदियुरप्पांनी आपल्या समर्थक आमदारांना गेल्या आठवडा अखेरपासून एका पंचातारांकित रेझॉर्टमध्ये मुक्कामाला ठेवलं आहे. यात पक्षाच्या अर्ध्याहून अधिक आमदारांचा समावेश आहे.

 

आमदारांच्या अनुपस्थितीमुळे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना अर्थसंकल्प सादर करणं अशक्य झालं आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राजकीय पेचप्रसंग सोडवण्यासाठी मध्यस्थ पाठवण्याचं वचन दिलं होतं.

 

लोकायुक्तांनी जुलै २०११ मध्ये बेकायदेशीर खाण प्रकरणात येदियुरप्पांवर ठपका ठेवल्यानंतर येदियुरप्पांना केंद्रीय नेतृत्वाने राजीनामा देण्यास भाग पाडलं होतं. माजी लोकायुक्त न्यायाधीश संतोष हेगड यांनी केलेल्या चौकशीत येदियुरप्पा आणि महत्वाच्या सरकारी अधिकाऱ्यांमुळे बेकायदेशीर खनिज उत्खननामुळे कर्नाटक राज्याला पाच वर्षाच्या काळात १६०० कोटी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावं लागलं. येदियुरप्पांनी जुलै ३१ रोजी कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता.