www.24taas.com, नवी दिल्ली
पार्टी विथ डिफरन्स असं बिरूद मिरवणाऱ्या भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पुन्हा बंडांचा झेंडा हाती घेतला आहे. येडियुरप्पा आपल्या समर्थकांसोबत थोड्याच वेळात बैठक घेणार असून पुढील रणनिती ठरवण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळपर्यंत ते भाजपला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
येडियुरप्पा यांनी काल एका कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची स्तुती करून भाजप नेतृत्वावर आगपाखड केली होती. भाजपमध्ये नेते अडचणीत आल्यानंतर त्यांना पक्षाकडून वाऱ्यावर सोडण्यात येत असल्याची टीका येडियुरप्पांनी केली होती. कर्नाटकातल्या अवैध खाणकामाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं येडियुरप्पांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.
त्यामुळं त्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. त्यामुळं त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या विराजमान होण्याच्या मार्गात मोठा अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा पक्षनेतृत्वावर दबाब निर्माण केल्याची खेळी येडियुरप्पा खेळत असल्याचं बोललं जात आहे.