www.24taas.com, चेन्नई
सार्वजनिक जीवनात पारदर्शकता यावी, यासाठी बडे नेते आणि प्रशासकीय अधिकारी आपली संपत्तीची माहिती जग जाहीर करतात. मात्र, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आपली संपत्ती जाहीर करण्याची भीती वाटत आहे. सोनियांच्या मते यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येत असून त्यांच्या सुरक्षेला धोका आहे.
सोनिया गांधी यांच्या खासगी संपत्ती संदर्भात माहितीच्या अधिकारात चेन्नई येथील आरटीआय कार्यकर्ते व्ही गोपालकृष्णन यांनी एक अर्ज दाखल केला होता. मात्र सोनिया गांधी यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. या अर्जात सोनिया गांधींनी २०००-०१ ते २०१०-११ या काळात आयटी रिटर्न भरला का अशी माहिती विचारण्यात आली होती. मात्र, या संदर्भातील माहिती संबंधीत खात्याकडे असल्याचे सांगून हा अर्ज धुडकावून लावला.
गोपालकृष्णन यांच्या अर्जावर दिल्लीचे आयकर सहआयुक्तांनी सोनिया गांधी यांना २३ जानेवारी रोजी एक पत्र पाठवले होते. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.
माझी संपत्ती जाहीर करण्यात कोणतेही जनहीत नसल्याचे सोनिया गांधी यांनी सहआयुक्तांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. तसेच अशा प्रकारे संपत्ती जाहीर करून माझ्या वैयक्तीक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचेही त्यांनी यात नमूद केले आहे.
आयकर खात्याला दिलेली माहिती गुप्त ठेवण्यात यावी, ती कोणाकडेही उघड करून नये असे आयकर कायद्यात नमूद केल्याचेही सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. या प्रकारच्या उत्तरामुळे माहितीच्या अधिकारार्तंगत मागवलेली ही माहिती नाकरण्यात आली.