www.24taas.com, सिंधुदुर्ग
कोकणातल्या प्रसिद्ध अशा आंगणेवाडीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. श्री भराडी देवीच्या यात्रेनिमित्त आज आंगणेवाडीत भक्तीचा महापूर लोटला.
यंदाही आंगणेवाडीची यात्रा भगव्या वातावरणात फुलून गेली आहे. मात्र मुंबई ठाण्यातल्या निवडणूक निकालानंतर अनेक राजकारणी नवस फेडण्यासाठी आंगणेवाडीला येतायत. त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने आंगणेवाडीत राजकारण्यांची जत्राच भरणार आहे. मंदिर व्यवस्थापकांबरोबरच प्रशासन आणि ग्रामस्थ आणि राजकीय नेते यात्रेला आलेल्या भक्तांची काळजी घेत होते आई भराडीला पहाटेच मंगल मंत्रघोषात पंचनद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला. देवीला साडीचोळी, मुखवटा आणि अलंकारांनी सजविण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आंगणेवाडीत व्हीआयपींची गर्दी होती. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने सर्वसामान्यांसाठी थेट गाभार्यात प्रवेश दिल्याने भाविक खूश होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मसुरे गावातल्या आंगणेवाडीची भराडीदेवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा...त्यामुळं दरवर्षी भरणा-या या यात्रेसाठी लाखो भाविक देवीला नवस बोलतात. तर ही भराडीदेवी हमखास नवस पूर्ण करतेच असा राजकारण्यांना ठाम विश्वास. यंदा मुंबई ठाण्यातल्या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये तळकोकणातल्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे.
अनेक उमेदवारांनी तर भराडीदेवीला नारळ अर्पण करुनच निवणुकीचा अर्ज भरला होता. त्यामुळे यंदाच्या आंगणेवाडी जत्रेत नवस फेडण्यासाठी मुंबई ठाण्यातले नगरसेवक दाखल झाले आहेत. त्याचा अधिक ताण आता सुरक्षाव्यवस्थेवर पडला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने आमदार परशुराम उपरकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, शाखा क्रमांक ६२ तर्फे यांच्यावतीने मोफत सरबत वाटप, आयुर्वेदिक शिबीर, मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती.
व्हिडिओ पाहा..
[jwplayer mediaid="55122"]