कपिल राऊत, www.24taas.com, ठाणे
ठाण्यातल्या कामगार हॉस्पिटलची अशरक्षः दूरवस्था झाली आहे. कामगारांसाठीचं एकमेव हॉस्पिटल असूनही प्राथमिक सुविधांचाही याठिकाणी अभाव आहे. पेशंट्सना निकृष्ट दर्जाच्या जेवणासोबतच अनेक प्रकारच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंय.
अस्वच्छ परिसर, तुटलेले बाथरुम्सचे दरवाजे, ५०० बेड्सपैकी फक्त ८२ वापरात, निकृष्ट दर्जाचं जेवण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राथमिक सोयींसुविधांचाच अभाव अशी ठाण्यातल्या कामगार हॉस्पिटलची भयानक परिस्थिती आहे. इतकंच नाही तर हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलांसाठी एकही महिला कर्मचारी नाही. दोन-दोन महिने पेशंट्स ऍडमिट आहेत, मात्र साहित्याच्या अभावामुळं ऑपरेशन रखडलंय. जनरेटरमध्ये डिझेल नसल्यानं पेशंट्सना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. असा हॉस्पिटलच्या असुविधांचा पाढा न संपणाराच आहे.
याबाबत संबंधित अधिका-यांना जाब विचारला असता त्यांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला. वर्षानुवर्ष कष्टाची कामं करणा-या आणि गरीब कामगारांसाठी असणा-या हॉस्पिटल सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळं हे कामगार हॉस्पिटलच आजारी पडल्याची संतप्त भावना व्यक्त होतेय.