निवडणुकांच्य़ा बारने कामकाज थांबले

राज्यातील १९६ नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा करून आयोगाने निवडणुकांचा बार उडवून दिला आहे. आचारसंहितेमुळे सरकारी आणि विकास कामांना खिळ बसली आहे.

Updated: Nov 2, 2011, 06:23 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

राज्यातील १९६ नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा करून आयोगाने निवडणुकांचा बार उडवून दिला आहे. त्यामुळे राज्यात आता राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आचारसंहितेमुळे सरकारी आणि विकास कामांना खिळ बसली आहे.

 

रायगड जिल्हातील १०, रत्नागिरीतील ५ आणि सिंधुदुर्गातील ३ नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.  ही रणधुमाळी संपतेना संपते तोच मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि पिंपरी-चिंचवडसह १0 महत्त्वाच्या आणि राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या असणार्‍या महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होणार असून, त्यांची घोषणाही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

 

जाहीर झालेल्या नगरपालिकांचे मतदान ८ डिसेंबरला होऊन निकाल ९ डिसेंबरपर्यंत हाती येणार आहेत. त्यानंतर १२ डिसेंबरला नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरणार आहे. सुमारे दोन ते तीन आठवडे अधिवेशन चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर तत्काळ ही निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.