'अभामसा' संमेलन अध्यक्षपदी वसंत डहाके

Updated: Dec 17, 2011, 08:00 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

चंद्रपूर येथे होणाऱ्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी व समीक्षक वसंत आबाजी डहाके यांची निवड झाली आहे.

 

डहाके यांना५५०  पैकी ३७४  इतकी भरघोस मते मिळाली. गिरगावातील साहित्य संघातील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात मतमोजणी झाली. हे संमेलन ३ ते ५ फेब्रुवारी २०१२या कालावधीत होणार आहे. चंद्रपूर येथे तब्बल ३८ वर्षांनी हे संमेलन होत आहे. विदर्भातील या संमेलनात विदर्भातीलच कवी डहाके यांची अध्यक्षपदी निवड होण्याचा योग जुळून आला आहे.

 

डहाके यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. प्रतिमा इंगोले आणि प्रा. जवाहर मुथा यांचा पराभव केला. इंगोले यांना १५९ तर प्रा. मुथा यांना १७ मते मिळाली.  डहाके यांना निर्विवाद बहुमत मिळाल्याने पहिल्या पसंतीचीच मते ग्राह्य धरण्यात आली. एकूण ५६९  मतपत्रिका महामंडळाकडे आल्या होत्या. त्यापैकी १९ अवैध होत्या, अशी माहिती निर्वाचन अधिकारी ऍड. यशोधन दिवेकर यांनी दिली.

 

महामंडळाचे एकूण ७९१ मतदार आहेत. यंदा पोस्टाच्या फ्रॅंकिंग पद्घतीने उमेदवारांना दोन महिने आधी मतपत्रिका पाठवण्यात आल्या होत्या. तरीही अनेकांना त्या मिळाल्या नाहीत. ४५  जणांनी अर्ज केल्यानंतर त्यांना पुन्हा मतपत्रिकांच्या दुय्यम प्रती देण्यात आल्या. या ४५ जणांपैकी ३८ जणांनी मतदान केले, अशी माहिती महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

वसंत डहाके यांचे साहित्य

१९६६ च्या 'सत्यकथे'च्या दिवाळी अंकातील 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे वसंत डहाके यांचे नाव  नावारूपाला आले. 'शुभवर्तमान', 'शुन:शेप', 'चित्रलिपी' या कविता प्रसिद्घ आहेत. 'सर्वत्र पसरलेली मुळं' हा त्यांचा दीर्घ काव्यसंग्रह, 'अधोलोक आणि मर्त्य' ही कादंबरी अशी डहाके यांची साहित्यसंपदा आहे. विदर्भ साहित्य संघाचा 'जीवनव्रती' पुरस्कार, 'चित्रलिपी' या कवितेसाठी २००९ ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.