विकास भदाणे, www.24taas.com, चाळीसगाव
जिल्हा परिषदेच्या सदस्याकडून ६० लाखांची खंडणी मागून अपहरण करणारे चाळीसगावचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनोज लोहार अडीच वर्षांनंतरही मोकाटच आहेत. इतकंच नव्हे तर या प्रकरणातून अपहरणाचं कलमच काढण्यात आल्यानं पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
चाळीसगावचे तत्कालीन अतिरीक्त पोलीस अधिक्षक मनोज लोहार यांनी बांधकाम ठेकेदारानं केलेल्या तक्रारीचं प्रकरण मिटवण्यासाठी खंडणी मागितली होती. धीरज येवले या काँग्रेस कार्यकर्त्यामार्फत जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांच्याकडे लोहार यांनी ६० लाखांची खंडणी मागितली होती. २००९ मधील हे प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. औरंगाबाद खंडपीठ आणि सर्वोच्य न्यायालयानं लोहार यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मात्र अपहरणाचं कलम काढून टाकण्यात आल्यानं विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांक़डे तक्रार केली.
गेल्या अडीच वर्षात लोहार यांना अटक झाली नाही. वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या लोहार यांचे दोन बंधुही वरीष्ठ पोलिस अधिकारी आहे. वडीलही सेवानिवृत्त वरीष्ठ पोलिस अधिकारी आहेत. त्यामुळं मनोज लोहार यांना पाठीशी घातलं जात असल्याची चर्चा आहे.